सदस्यांना बजेटची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:08 IST2018-02-21T22:08:09+5:302018-02-21T22:08:26+5:30
जिल्हा परिषदेच्या सदस्यांना बजेट सभेची प्रतीक्षा आहे. २४ ते २७ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याचा अंदाज आहे.

सदस्यांना बजेटची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सदस्यांना बजेट सभेची प्रतीक्षा आहे. २४ ते २७ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याचा अंदाज आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातर्फे दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. या अंदाजपत्रकात योजनानिहाय तरतूद आणि संभाव्य खर्चाचा ताळमेळ बसविला जातो. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून कोणत्या योजना पूर्णत्वास जातील, याचा लेखाजोखा मांडला जातो. सोबतच जिल्हा परिषदेच्या मिळकतीतून प्राप्त होणाºया सेस फंडातूनही विविध योजनांसाठी तरतूद केली जाते.
वित्त विभागाने सर्व विभागांना पत्र देऊन त्यांना संभाव्य खर्चाबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. कोणत्या योजनांसाठी किती रूपये लागतील, याचा अंदाज सादर करण्याचे आदेश दिले. सर्व विभागांकडून नियोजित खर्चाची माहिती मिळाल्यानंतर या महिन्याच्या शेवटी सर्व विभाग प्रमुखांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. त्यात अंदाजपत्रकाचा कच्चा मसुदा तयार होणार आहे. नंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थ समितीच्या सभेत या अंदाजपत्रकाला मूर्त स्वरूप दिले जाणार आहे.
अर्थ समितीत अंदाजपत्रकावर साधकबाधक चर्चा झाल्यानंतर हे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवले जाणार आहे. बजेटची सर्वसाधारण सभा दरवर्षी २४ ते २७ मार्च दरम्यान घेतली जाते. यावर्षीही २७ मार्चपूर्वी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंजूर होणार आहे.
मंजूर निधीही अखर्चित
दरवर्षी सेस फंडातून शेतकरी, लाभार्थ्यांसाठी विविध योजनांवर लाखोंची तरतूद केली जाते. मात्र आर्थिक वर्ष संपत असतानाही हा निधी तसाच पडून राहतो, असा आजवरचा अनुभव आहे. मागीलवर्षीच्या अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेला निधीही अद्याप पडून आहे. कृषी, समाजकल्याण, बांधकाम विभागाकडे सेसचा निधी अखर्चित आहे. हाच निधी खर्च झाला नसताना यावर्षी पुन्हा सेसमधून निधीची तरतूद केली जाणार आहे. हा निधी पुढील मार्चपूर्वी खर्ची घालण्यासाठी पदाधिकारी, सदस्यांनी आक्रमक होण्याची गरज आहे.