वाघाडी नदीचे पात्र माती उत्खननाने धोक्यात
By Admin | Updated: December 29, 2014 02:20 IST2014-12-29T02:20:13+5:302014-12-29T02:20:13+5:30
हिवाळ््याच्या सुरूवातीलाच तालुक्यात वीट भट्टी व्यवसायाला सुरूवात होते. यावर्षी तर चक्क वीटभट्टी व्यावसायिकांनी ...

वाघाडी नदीचे पात्र माती उत्खननाने धोक्यात
घाटंजी : हिवाळ््याच्या सुरूवातीलाच तालुक्यात वीट भट्टी व्यवसायाला सुरूवात होते. यावर्षी तर चक्क वीटभट्टी व्यावसायिकांनी वाघाडी नदी पात्राच्या दरड खोदून माती नेण्याचा सपाटा चालविला आहे. एवढेच नव्हे तर प्रवेशास बंदी असलेल्या वनहद्दीतूनही मातीचा उपसा केला जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे आर्थिक हितसंबंधातून दुर्लक्ष होत आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाचे तीनतेरा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनहद्दीतील वनसंपदा धोक्यात आली आहे.
महसूल विभागाकडून वीटभट्टीची परवानगी देण्यात येते. एक ते तीन लाखापर्यंत नगांची भट्टी लावण्याची पारवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र १५ ते २० लाखांच्यावर विटा भट्टीतून निर्माण केल्या जातात. शासनाचा महसूल बुडवून जास्तीत जास्त कमाई कशी होईल यादृष्टीने वीटभट्टी व्यावसायिक हा कारभार करतात. अर्थात त्याला प्रशासनाचेही पाठबळ असतेच. पूर्वी विटांसाठी राख आणि पडीक शेतातील मातीचा उपयोग व्यावसायिक करायचे. आता प्रशासनाच्या आशिर्वादाने त्यांनी चक्क नदीपात्र आणि वनजमीनीला मातीसाठी वेठीस धरले आहे. फुकटात माती उपलब्ध होत असल्याने तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचे चांगलेच फावत आहे.
घाटंजी तालुक्यातील नागेझरी, मानोली, शिरोली, कोळी, उंदरणी, येळाबारा, दहेगाव, दहेली, पांढुर्णा, शिवणी, घोटी, मारेगाव, मोवाडा, दत्तापूर आदी गांवांमध्ये शेकडो वीटभट्ट्या आहेत. एक ते तीन लाख विटांची निर्मिती करण्याची परवानगी घेऊन आधीच यातील बहुतांश वीटभट्टी व्यावसायिकांनी शासनाचा महसूल बुडविला. आता त्यांनी वाघाडी नदीच्या पात्रातूनच दरड खोदून माती नेण्याचा सपाटा चालविला आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)