विधान परिषदेचे मतदार नेत्यांच्या ‘मध्यस्थी’ने त्रस्त
By Admin | Updated: November 17, 2016 01:23 IST2016-11-17T01:23:39+5:302016-11-17T01:23:39+5:30
विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. मात्र त्यात नेते मंडळीच ‘मध्यस्थी’ करीत असल्याने

विधान परिषदेचे मतदार नेत्यांच्या ‘मध्यस्थी’ने त्रस्त
उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचलेच नाही : ४८ सदस्यांची ‘वजन’ वाढविण्यासाठी कळंबमध्ये बैठक
यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. मात्र त्यात नेते मंडळीच ‘मध्यस्थी’ करीत असल्याने मतदारांना ‘कोण-किती’ याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. या मध्यस्थांमुळेच मतदार त्रस्त आहेत.
विधान परिषदेसाठी १९ नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असताना मतदारांमधील अस्वस्थता उफाळून आली आहे. कारण आपल्या नावावर मध्यस्थाची भूमिका वठविणारे नेते तर ‘दुकानदारी’ करणार नाही ना अशी हूरहूर या मतदारांना आहे. उमेदवार अद्यापही मध्यस्थांमध्येच गुरफटलेले आहेत. एवढेच नव्हे तर हे मध्यस्थ उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत पोहचण्यात अप्रत्यक्ष अडथळे निर्माण करीत असल्याची माहिती आहे. उमेदवारांनी थेट आमच्याकडे ‘अॅप्रोच’ व्हावे, मध्यस्थ-नेत्यांना ‘किंमत’ देण्याची गरज नाही, असा मतदारांमधील सूर आहे. सर्व काही अंधारात आणि थर्ड पार्टी होत असल्याने मतदारांमध्ये उमेदवारांप्रती नाराजी वाढते आहे.
अशाच नाराजीतून भाजपा-शिवसेना व राष्ट्रवादीतील ४८ सदस्य मंगळवारी एकत्र आले. त्यांची कळंबमध्ये गुप्त बैठक झाली. अपक्षाने काही दिवसांपूर्वी घाटंजीमध्ये मतदारांना आठ बोटे दाखविली होती. ते पाहून शिवसेनेने दोनही पंजे मतदारांपुढे उघड केले. मात्र प्रत्यक्षात सध्या टोकन म्हणून अवघी दोन ते तीन बोटे फिरविली जात असल्याने मतदार संभ्रमात सापडले आहेत. उमेदवारांनी बोलल्याप्रमाणे ‘वजन’ वाढवावे म्हणून दबाव निर्माण करण्याचे कळंबच्या बैठकीत ठरले.
जिल्ह्यात विधान परिषदेच्या मतदारांचे तीन गट पडल्याचे चित्र आहे. एक काँग्रेसकडे, दुसरा सेनेकडे तर तिसरा गट ऐनवेळी निर्णय घेऊ अशा भूमिकेत आहे. बाहेरचा उमेदवार काय करणार असा या तिसऱ्या गटाचा सवाल आहे. वास्तविक सेनेच्या पहिल्यांदाच यवतमाळ पाहणाऱ्या उमेदवाराने भविष्यात यवतमाळच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या काय योजना आहेत, याचा कधीही व कुठेही उहापोह केलेला नाही. त्यामुळे यवतमाळची जनता आणि विशेषत: मतदार शिवसेनेच्या या उमेदवाराबाबत संभ्रमात दिसत आहे. हे उमेदवार भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने जनतेला किंवा माध्यमांनाही सविस्तर सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळेच हा संभ्रम वाढला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)