विधान परिषदेच्या मतदारांची गुंतागुंत
By Admin | Updated: November 18, 2016 02:26 IST2016-11-18T02:26:09+5:302016-11-18T02:26:09+5:30
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अवघ्या ४८ तासांवर आली आहे.

विधान परिषदेच्या मतदारांची गुंतागुंत
निवडणूक : दोघेही प्रबळ, पण अंदाज येईना !
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अवघ्या ४८ तासांवर आली आहे. मात्र कुणाचे पारडे जड याचा अंदाज बांधणे भल्याभल्यांनाही जमेनासे झाले आहे. कारण दोघांनीही मतदारांच्या ‘भेटी-गाठी’ घेतल्याने हे दोनही प्रमुख उमेदवार प्रबळ ठरत आहेत.
विधान परिषदेची ही निवडणूक शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी आणि जिल्हा प्रमुखद्वयींची कसोटी पाहणारी ठरणार आहे. प्रा. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेचा हा किल्ला सर केल्यास उपरोक्त सर्वांचेच ‘मातोश्री’वर वेगळे वजन निर्माण होणार आहे. या विजयाचे श्रेय कमी अधिक प्रमाणात भाजपाचे येथील राज्यमंत्री आणि त्यांच्या अन्य चार आमदारांनाही निश्चितच मिळणार आहे. भाजपा-सेनेच्या या नेत्यांनी आपसी व पक्षीय वर्चस्वाच्या लढाईचा विचारही मनात न आणल्यास तानाजींचा विजय काहीच कठीण नाही. वर्चस्वाच्या मुद्यावर दोनही पक्षाचे नेते एकजूट दिसत असले तरी कार्यकर्त्यांमधून मात्र विरोधी सूर उमटताना दिसतो आहे. या क्षणी या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळू नये, एवढीच अपेक्षा प्रा. तानाजींचे निकटवर्तीय बाळगून आहेत.
काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे फारपूर्वीपासून विधान परिषदेच्या तयारीला लागले आहे. त्यांनी आतापर्यंत मतदारांच्या प्रत्यक्ष संपर्काचे दोन ते तीन राऊंड पूर्णही केले. यामुळे त्यांच्याबाबत मतदारांमध्ये सहानुभूती असणे साहाजिक आहे. त्यातच ते ‘स्थानिक’ आहेत. मतदारांपैकीच एक असल्याने आपण विजयाचा जादूई आकडा गाठू असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. त्यांचे राजकीय गॉडफादर असलेले माजीमंत्री शिवाजीराव मोघे त्यांच्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहे. काँग्रेसची अन्य नेते मंडळीसुद्धा तेवढ्याच ताकदीने प्रयत्नरत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये दोन गट असले तरी ही गटबाजी विधान परिषदेत दिसू नये अशी मतदारांची अपेक्षा आहे. ही गटबाजी छुप्या पद्धतीने कायम राहिल्यास बडेंना धोका संभवतो. काँग्रेसकडून प्रा. तानाजी सावंत ‘बाहेर’चे आहे, सेनेची ताकद वाढणार, भाजपाला बॅकफुटवर जावे लागणार, असा प्रचार केला जात असलातरी सेना-भाजपाची नेते मंडळी त्याला भीक घालताना दिसत नाही.
शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांनीही ‘भक्कम’ तयारी केली आहे. मतदारांना ‘खूश’ करण्याची कोणतीही कसर त्यांनी सोडलेली नाही. ३०० पाठीराख्यांसाठी जेवण बनविले, त्यातील २७५ ते २८० निश्चितच जेवणाला येतील, असा त्यांचा अंदाज आहे. येथील गटबाजी, वर्चस्वाची लढाई या सर्वांवर आपला मितभाषी स्वभाव, मराठवाड्यात राबविलेले शिवजलक्रांती अभियान मात करेल व आपण विजयश्री खेचून आणू असा त्यांचा विश्वास आहे.
विधान परिषदेचे दोनही उमेदवार तुल्यबळ आहे. मतदार दोनही उमेदवारांच्या ‘खानापूर्ती’त सहभागी झाले आहेत. शिवाय मतदारांचा नेमका कल लक्षात येत नसल्याने अजूनही गुंतागूंत कायम आहे. नेमका कोण गड सर करेल, याचे आडाखे बांधणे चांगलीच कठीण जात आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही ‘वास्तव’ काय राहील, हे सांगताना येथील राजकीय जाणकारांचीही कसोटी लागत आहे. दोनही पक्ष विजयाचे दावे करीत आहे. मात्र मतदारांच्या ‘टच’मध्ये असलेल्या प्रमुख समर्थकांच्या चेहऱ्यावर विजयाचा तो विश्वास दिसत नसल्याने अनेकांच्या मनात हूरहूरही घर करून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)