झालेल्या मतदानापेक्षा मोजलेले मतदान अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:44 IST2019-05-25T21:44:05+5:302019-05-25T21:44:49+5:30
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले होते. आयोगानेच ही आकडेवारी जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ११ लाख ६९ हजार ९७७ मते मोजण्यात आल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर जाहीर करण्यात आली आहे.

झालेल्या मतदानापेक्षा मोजलेले मतदान अधिक
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले होते. आयोगानेच ही आकडेवारी जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ११ लाख ६९ हजार ९७७ मते मोजण्यात आल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे १७१ जादा मते आली कोठून असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
एकीकडे ईव्हीएमबाबत बऱ्याच समाजघटकांंना संशय असताना, राजकीय कार्यकर्त्यांच्या तक्रारी असताना मतदानाच्या आकडेवारीतील तफावतीने संभ्रम वाढला आहे. निवडणूक आयोगाचे वोटर टर्न आऊट हे मोबाईल अॅप, वेबसाईटवरील आकडेवारीत तफावत दिसत आहे. त्यातही वाशिम विधानसभा मतदारसंघात ३६१ मते जास्त तर राळेगाव विधानसभा मतदारसंघात ३२९ मते कमी दाखविल्याने संभ्रम वाढला.
कंट्रोल युनिटमधून आलेले मतदानच बरोबर : गुल्हाने
आयोगाच्या अॅपवर मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसत आहे, हे बरोबर आहे. एखाद्या मतदान केंद्रावरील प्रिसायडिंग आॅफिसरने आकडेवारी भरताना चूक केल्यास अशी तफावत दिसू शकते. समजा एखाद्या ठिकाणी ४२५ मतदान झाले आणि कर्मचाऱ्याने ४१५ आकडा भरला तर एकूण मतदानाच्या आकड्यात फरक पडतो. त्यातूनच आयोगाच्या अॅपवर माहिती नोंदविली जाते. मात्र, मतमोजणीत ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमधून बाहेर आलेलाच खरा मतदानाचा आकडा आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.