अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले 

By विलास गावंडे | Published: November 27, 2023 07:19 PM2023-11-27T19:19:41+5:302023-11-27T19:19:55+5:30

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविलेल्या एसटी बँक संचालकांमध्ये अवघ्या पाच महिन्यांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे.

Volatility in ST Bank in just five months Movement among directors due to governance, loan disbursement was also stopped | अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले 

अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले 

यवतमाळ: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविलेल्या एसटी बँक संचालकांमध्ये अवघ्या पाच महिन्यांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. या बँकेचे कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक मुद्यांवरून चलबिचल सुरू असल्याने यातून कसा मार्ग निघतो, याकडे आता हजारो सभासदांचे लक्ष लागले आहे. अशातच बँकेचे काही संचालक 'नॉट रिचेबल' झाल्याने गुंता वाढल्याचे चित्र आहे.

राज्यभरात ६२ हजार सभासद आणि ५० शाखा असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेत (एसटी बँक) दीर्घ कालावधीनंतर पाच महिन्यांपूर्वी सत्तापरिवर्तन झाले. पूर्वी कामगार संघटनाप्रणीत संचालक मंडळ होते. पाच महिन्यांपूर्वी ॲड. सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील कष्टकरी जनसंघाने एकाहाती विजय मिळविला. पॅनलचे सर्व १९ संचालक निवडून आले. मात्र, मागील काही दिवसांत या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय कमालीचे वादात सापडले आहेत. बँकेने कर्जाचा व्याजदर कमी केला, काही प्रकरणात विनाजामीन कर्जवाटप झाले, शिवाय कर्जाचा विमा उतरविण्याचाही निर्णय घेण्यात आला. या सर्व निर्णयामुळे नव्या संचालकांचा कारभार वादाचा ठरतो आहे. ॲड. सदावर्ते यांच्या मार्गदर्शनातच बँक चालविली जात असल्याचा आरोप आहे. मर्जीतील लोकांना नियुक्त्या देणे असे प्रकार सुरू झाले. या बाबी काही संचालकांना खटकू लागल्याने त्यांच्यात खदखद दिसून येत आहे.

बँकेचे काही संचालक मागील चार दिवसांपासून संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. त्यांनी रजा टाकल्या आहेत. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्कही होत नाही. त्यामुळे या संचालकांचा नेमका काय विचार आहे, याविषयी चर्चा रंगू लागली आहे. त्यांना वेगळी चूल तर मांडायची नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे. ते अचानक नॉट रिचेबल असल्याने या शंकेला बळ मिळत आहे.

या बँकेवर यवतमाळ व अमरावती या दोन विभागांतून असलेले दोन्ही संचालक संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. त्यांच्यासह इतर काही संचालकांचा नेमका मनसुबा काय असावा, हे मात्र कळू शकले नाही. हा सर्व प्रकार इकडे सुरू असताना तिकडे बँकेची आर्थिक स्थिती खराब होत चालली आहे.

४६६ कोटींच्या ठेवी कमी झाल्या
एसटी बँकेवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर ४६६ कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत. ३० जून २०२३ पूर्वी दोन हजार ३११ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. आता त्या १८४५ कोटींवर आल्या आहेत. बँकेने ठेवीपेक्षा अधिक कर्ज वाटप केल्याने सीडी रेशो ९५.४९ टक्क्यांवर गेला. अर्थात शंभर रुपयाच्या ठेवीतून ७५ रुपयेच कर्ज वाटप करता येते. ही मर्यादा बँकेने पार केल्याने रेशो वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बँकेच्या कार्यपद्धतीवर सभासदांचा रोष आहे. काही संचालकांमध्येही नाराजी आहे. ही बाब बँकेच्या दृष्टीने चिंतेची आहे. नियमबाह्य पद्धतीने होत असलेली कामे थांबायला पाहिजेत. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

बँक सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. संचालकांमध्ये कुठलीही नाराजी नाही. वैयक्तिक कारणांमुळे ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. बँकेचा कारभार चांगल्या रीतीने चालावा यासाठी अनुभवी लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे. - मनोज महल्ले, विभागीय अध्यक्ष, कष्टकरी जनसंघ, यवतमाळ

 
 

Web Title: Volatility in ST Bank in just five months Movement among directors due to governance, loan disbursement was also stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.