भरपावसात विराट दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 02:35 IST2016-09-26T02:35:55+5:302016-09-26T02:35:55+5:30
धो-धो कोसळणाऱ्या पावसात मराठा-कुणबी समाजबांधवांनी आपल्या मागण्यांसाठी विराट दर्शन मोर्चाच्या माध्यमातून घडविले.

भरपावसात विराट दर्शन
यवतमाळात घडला इतिहास : मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा
यवतमाळ : धो-धो कोसळणाऱ्या पावसात मराठा-कुणबी समाजबांधवांनी आपल्या मागण्यांसाठी विराट दर्शन मोर्चाच्या माध्यमातून घडविले. प्रत्येकासाठी खरेच ऐतिहासिक ठरावा असा हा क्षण होता. कधी नव्हे ती महिला आणि युवतींची लक्षणीय उपस्थिती मोर्चाचे वैशिष्ट ठरले. लाखोंच्या संख्येत उपस्थिती असूनही येथील शिस्तबद्धता प्रशिक्षित दलातील सदस्यांनाही लाजविण्यासारखी होती.
समता मैदानावर (पोस्टल ग्राऊंड) सकाळपासून जिल्हाभरातील मराठा-कुणबी समाजबांधव दाखल होऊ लागले. मैदान खचाखच भरल्यानंतर प्रवीण देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. उरी हल्ल्यातील शहीद आणि कोपर्डीसह देशभरात अत्याचाराने प्राण गमवावा लागलेल्या तरुणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिजाऊ वंदना झाली. १ वाजताच्या सुमारास महिला, युवती यांच्या पुढाकारात मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा पुनम चौक, हनुमान आखाडा चौक, पाचकंदिल चौक, जाजू चौक, अणे महिला महाविद्यालयासमोरून, दत्त चौक, नेताजी चौक, बसस्थानक चौक असे मार्गक्रमण करीत एलआयसी चौकात पोहोचला. मोर्चा निघताना पावसाला जी सुरूवात झाली, ती संपेपर्यंत कायम होती. मात्र, मराठा-कुणबी समाजबांधवांनी पावसातही मोर्चाची शिस्त मोडली नाही.
एलआयसी चौकात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मनिषा काटे, सोनाली वादाफळे, समृद्धी राऊत, मयुरी कदम, सृष्टी दिवटे, श्रावणी कडू या तरुणींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवलेसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर मोर्चाला स्नेहल टोम्पे (लांडगे), रूबाली शिर्के, शितल साळुंके, सृष्टी दिवटे, साईश्वरी गायकवाड यांनी संबोधित केले. हा मोर्चा कुणा जाती-धर्माविरोधात नसून न्याय्य मागण्यांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोपर्डीच नव्हेतर त्यासारख्या इतर कुठल्याही घटनांमध्ये आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या आरोपींना फासावर लटकवावे, असा एकमुखी सूर या तरुणींच्या भाषणाचा होता. या सभेचे आभार वैदेही देशमुख हिने मानले. संचलन कैलास राऊत यांनी केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. (कार्यालय प्रतिनिधी)