उमेदवारांकडून नियमाचे उल्लंघन
By Admin | Updated: November 17, 2016 01:35 IST2016-11-17T01:35:51+5:302016-11-17T01:35:51+5:30
वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांकडून नियमाचे उघडपणे उल्लंघन होत आहे.

उमेदवारांकडून नियमाचे उल्लंघन
धावत्या वाहनातून प्रचार : निवडणूक विभागाचा कारवाईचा इशारा
वणी : वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांकडून नियमाचे उघडपणे उल्लंघन होत आहे. धावत्या वाहनातून प्रचार करण्यावर निवडणूक विभागाने बंदी घातली असली तरी उमेदवारांच्या प्रचार वाहनांकडून या बंदीला पायदळी तुडविले जात आहे. बहुतांश उमेदवारांची प्रचार वाहने धावत्या वाहनातूनच प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जाहीर प्रचाराच्या पाचव्या दिवशी ही बाब निवडणूक विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर बुधवारी निवडणूक विभागाच्या पथकाने संबंधित उमेदवारांना धावत्या वाहनातून प्रचार करण्यावर चाप आणला.
अनेक वर्षानंतर वणीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. प्रचारात आघाडी घेण्यासाठी उमेदवारांमध्ये चांगलीच चढाओढ निर्माण झाली आहे. वॉर्डावॉर्डात प्रचाराची वाहने धूळ उडवित फिरत आहेत. यातून ध्वनी प्रदूषणही वाढले आहे. कानठळ्या बसेल अशा आवाजात हा प्रचार सुरू असल्याने सामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यांपैकी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारासाठी चारचाकी वाहने लावली आहेत. या वाहनांकडून शहरातील गल्लीबोळा पिंजून काढल्या जात आहेत. प्रत्येक उमेदवाराने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी प्रचारावर चांगलाच भर दिला आहे.
नियमानुसार धावत्या वाहनातून प्रचार करता येत नाही. मात्र वणीत या नियमाला तिलांजली दिली जात आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार धावत्या वाहनातून केला जात आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांनी याची दखल घेत उमेदवारांना याबाबत तंबी दिली. मात्र सायंकाळपर्यंत धावत्या वाहनातूनच प्रचार सुरू होता. (कार्यालय प्रतिनिधी)