नदी काठावरील गावांना धोका
By Admin | Updated: July 30, 2014 00:03 IST2014-07-30T00:03:22+5:302014-07-30T00:03:22+5:30
तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नदीकाठावरील गावात नदीतील दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़

नदी काठावरील गावांना धोका
वणी : तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नदीकाठावरील गावात नदीतील दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़
तालुक्यातून वर्धा, पैनगंगा आणि विदर्भा नदी वाहते. त्यापैकी विदर्भा नदी काठावर वसलेल्या घोन्सा, दहेगाव, साखरा, दरा, बोपापूर, कुंभारखणी, बोर्डा, कायर या गावांमध्ये सध्या दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा समज झाला आहे. गेल्या सप्ताहात पावसाने तीन दिवस सतत हजेरी लावली होती़ त्यामुळे जंगल व नाल्यातील पाणी व वेकोलि खाणीतील रसानयुक्त पाणी नदीमध्ये मिश्रीत झाले आहे.
तालुक्यातील विदर्भा नदीची पातळी थोड्या प्रमाणात वाढली आहे़ परंतु नदीचे पाणी मात्र संपूर्ण गढूळ दिसून येत आहे़ तेच पाणी पाईपलाईनद्वारे नदी काठावरील पाण्याच्या टाकीत ओढले जाते व त्यानंतर गावामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो़
नदीतून टाकीत येणारे पाणी व्यवस्थित निर्जंतुकीकरण होत नाही. त्याबाबत ग्रामपंचायती उदासीन आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना त्याच दूषित पाण्याचा पुरवठा होतो. ते पाणी प्राशन केल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़ त्याचबरोबर मुक्या जनावरांनाही तेच पाणी प्राशन करावे लागत असल्याने त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे़
संबंधित ग्रामपंचायती या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे़ ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीमध्ये योग्य प्रमाणात ब्लिचींग पावडरचा वापरही करीत नाहीत. दूषित व गढूळ पाण्याचे व्यवस्थित निर्जंतुुकीकरण केले जात नाही. त्यामुळे नदी काठावरील गावात दूषित पाणी पोहोचत आहे़ सध्या ग्रामीण भागामध्ये साथीच्या विविध आजारांची लागण होत आहे. प्रत्येक घरी एक ना एक, रूग्ण हमखास आढळत आहे. त्याला दूषित पाणीच कारणीभूत ठरत आहे. नदी काठावरील प्रत्येक गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्य विभागाने तातडीने उपययोजना करण्याची आवश्यकता आहे.
आरोग्य विभाग ग्रामपंचायतींना ब्लिचींग पावडर पुरविते. मात्र ते नेमके जाते कुठे, असा प्रश्न आहे. कारण नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात ब्लिचींग पावडर टाकल्याचा लवलेशही नसतो. परिणामी ग्रामस्थांनाच पावसाळ्यात विविध साथ रोगांना तोंड द्यावे लागते. (कार्यालय प्रतिनिधी)