घारफळ परिसरातील गावे वादळी पावसाच्या तडाख्यात
By Admin | Updated: March 1, 2016 02:05 IST2016-03-01T02:05:09+5:302016-03-01T02:05:09+5:30
सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा घारफळ परिसराला जबर तडाखा बसला. तुरळक गाराही या भागात..

घारफळ परिसरातील गावे वादळी पावसाच्या तडाख्यात
तुरळक गारा : रबी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान, वीजपुरवठा खंडित
घारफळ : सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा घारफळ परिसराला जबर तडाखा बसला. तुरळक गाराही या भागात झाल्या. गहू, हरभरा, कापूस यासह भाजीपाला पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा मार झेलत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.
रात्री २ वाजताच्या सुमारास वादळ सुरू झाले. यानंतर पाऊस आणि गारा पडल्या. पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील उभे पीक उद्ध्वस्त झाले आहेत. घारफळ, परसोडी, सारफळी, एरंडगाव, गोंधळी, वडगाव, मुबारकपूर, गवंडी, खर्डा, सिंदी, वरूड, रेणुकापूर, पाचखेड, आष्टा, सौजना या गावांमधील शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. वीरखेड, वाटखेड या गावांमध्ये सतत दोन दिवस वादळी पाऊस आणि गारपीट झाली.
पावसाच्या कमी प्रमाणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे खरिपाचे उत्पादन बुडाले. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या रबी पिकांसह कपाशीला पाणी देवून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु अचानक झालेल्या पावसामुळे त्यांच्या या प्रयत्नावर पूर्णत: पाणी फेरले गेले आहे. संबंधित विभागाने पिकाच्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी आहे.
पाऊस आणि गारांमुळे परिसरातील वीटभट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बांधलेल्या विटांचा चिखल झाला, तर लावलेली भट्टी विझली. आता वीटभट्टी मालकांना यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे. शिवाय या भागातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. परिणामी विजेवर चालणारे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. (वार्ताहर)