गावकऱ्यांनी स्वीकारले ग्रामस्वच्छतेचे व्रत
By Admin | Updated: December 13, 2014 22:48 IST2014-12-13T22:48:22+5:302014-12-13T22:48:22+5:30
स्वच्छता म्हणजे आरोग्याचा मूलमंत्र. सार्वजनिक स्वच्छता तर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते.

गावकऱ्यांनी स्वीकारले ग्रामस्वच्छतेचे व्रत
ढाणकी : स्वच्छता म्हणजे आरोग्याचा मूलमंत्र. सार्वजनिक स्वच्छता तर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते. हे साम्राज्य नष्ट करण्याचे व्रत वारकरी संप्रदायाने हाती घेतले. अन् पाहता पाहता गावकऱ्यांच्या प्रतिसादाने आता ढाणकी गाव चकाचक झाले आहे.
उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असं बिरुद मिरवणारं हे गाव स्वच्छतेच्या बाबतीत मात्र अगदी नामनिराळचं. गावात जागोजागी प्लास्टिक विखुरलेले, कचऱ्याचे ढीग, भरलेली गटार. सर्व चित्र एकदम बकाल. ढाणकीच्या आर्थिक-सांस्कृतिक समृद्धीला न भोवणारं हे चिऋ बदलण्याचा निर्धार वारकरी संप्रदायाने केला. डॉ.लक्ष्मीकांत रावते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. अन् पाहता पाहता चित्र पालटलं.
आज सर्व गावं या मोहिमेत सामील झालं आहे. विविध व्यापारी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स संघटना ग्रामस्वच्छता मोहिमेत हिरीरीने भाग घेत आहेत. सकाळी ६ ते ८ या वेळात ग्रामस्वच्छता उपक्रम चालत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही सहभाग मिळत आहे.
ग्रामस्वच्छता मोहिमेमुळे ढाणकीचा चेहरामोहरा बदलला आहे. रस्ते चकाचक झालेले पाहायला मिळत असून विस्तीर्ण भासत आहेत. रस्त्यातील कचऱ्याचे ढीग नष्ट झालेले आहेत. तुंबलेली गटारंही वाहताना दिसत आहेत. येथे पाहायला मिळणारी स्वच्छता ढाणकीच्या वैभवनात भर घालणारी आहे. शिवाय ढाणकीत घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांचे पडसाद आजूबाजूच्या पाच-पंचवीस गावात उमटत असल्याने या स्वच्छता मोहिमेचा जागर त्या गावातही उमटेल, अशी आशा आहे. (वार्ताहर)