खेड्यातील शाळा आता नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: January 11, 2017 00:40 IST2017-01-11T00:40:04+5:302017-01-11T00:40:04+5:30
संगणकाच्या युगात आता गावखेडी कात टाकत आहे. शाळासुद्धा आता नवे स्वप्न घेऊन पुढे येताना दिसत आहे.

खेड्यातील शाळा आता नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर
ग्रामीण भागातही डिजिटल क्रांती : दारव्हा पंचायत समिती अंतर्गत लोकसहभागातून तब्बल ४० शाळा होत आहेत डिजिटल
दारव्हा : संगणकाच्या युगात आता गावखेडी कात टाकत आहे. शाळासुद्धा आता नवे स्वप्न घेऊन पुढे येताना दिसत आहे. डिजीटल क्रांतीच्या या युगात पाटीवर अक्षरे गिरवत गिरवत आता विद्यार्थी डिजीटल फळा वापरत आहेत. नव्या शैक्षणिक क्रांतीची ही रम्य पहाट दारव्हा तालुक्यात उगवत आहे.
विद्यार्थी क्षमता दृढ करण्यासाठी उपयोग व्हावा, शिक्षकांचा वेळ, अध्यापन कार्य सुरळीत आणि सहज, सोपे व्हावे, शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने दारव्हा पंचायत समिती अंतर्गत एका पाठोपाठ एक अशा तब्बल ४० शाळा डिजीटल झाल्या आहेत. तर चार शाळा मीनी डिजीटल झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने गावकरी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक व दानशूर व्यक्तींनी लोकसभाग देऊन प्रोजेक्टर, संगणकासह आवश्यक साहित्यांची खरेदी करून कार्यान्वित केली आहे. शाळा डिजीटल झाल्याने विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले आहे. पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम, ई-बुक्स विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध झाले आहेत. मनोरंजनातून व जलदगतीने शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण झाली आहे. तालुक्यातील पिंप्री, साजेगाव, निंभा, धनगरवाडी, महातोली, उमरी इजारा, दहेली, उचेगाव, रामगाव (हरू), घाटकिन्ही तांडा, लाडखेड, ब्रह्मी, बोरी, दुधगाव, खोपडी (बु.), लाडखिंड, सायखेड, महागाव, वडगाव गाढवे, खोपडी (खुर्द), भांडेगाव, वागदतांडा, चाणी, चिकणी, वडगाव (आंध), लोही, वरूड, कुऱ्हाड, धामणगाव देव, बोरेगाव, हरू, नायगाव, नखेगाव, नांदगव्हाण, दुधगाव, शेलोडी, ब्राह्मनाथ, पिंपळगाव, वारजई आदी ४० शाळा डिजीटल तर आंतरगाव, पिंपळगाव, चोरखोपडी, भोपापूर या चार शाळा मिनी डिजीटल झाल्या आहेत. लोकसहभागामध्ये प्रामुख्याने सचिन भारती यांनी सहा शाळांना लॅपटॉप दिले आहेत. राजाभाऊ ठाकरे व नुसरत अली खान यांनी शाळेसाठी जमीनदान दिली आहे. सुभाष यावले यांनी रोख २५ हजार, भावसिंग पवार यांनी संगणकासाठी २५ हजार, समीर बेग, नजीर बेग यांनी रोख २५ हजार, उत्तम राठोड यांनी २१ हजार रुपयांचा लोकसहभाग दिला आहे. शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, विस्तार अधिकारी विकास घाडगे, मुख्याध्यापक व सर्व सबंधित परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)