फाळेगावात एकाच चितेवर चौघा बापलेकांना भडाग्नी
By Admin | Updated: September 9, 2016 02:37 IST2016-09-09T02:37:18+5:302016-09-09T02:37:18+5:30
गरिबी आणि कौटुंबिक कलहातून तीन निरागस बालकांना विहिरीत लोटून स्वत:ही त्याच विहिरीत उडी घेऊन एका पित्याने आत्महत्या केली.

फाळेगावात एकाच चितेवर चौघा बापलेकांना भडाग्नी
रात्री अंत्यसंस्कार : चौघांच्या आत्महत्येने गावकरी शोकाकूल
बाभूळगाव : गरिबी आणि कौटुंबिक कलहातून तीन निरागस बालकांना विहिरीत लोटून स्वत:ही त्याच विहिरीत उडी घेऊन एका पित्याने आत्महत्या केली. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने फाळेगाववासी हादरून गेले. शवविच्छदनानंतर बुधवारी रात्री ११.४५ वाजता एकाच चितेवर चौघांनीही साश्रूनयनांनी भडाग्नी दिला. त्यावेळी प्रत्येक गावकऱ्याचे डोळे डबडबले.
फाळेगाव येथील पांडुरंग कोडापे याने आपल्या तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चौघांचे शवविच्छेदन रात्री बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पार पडले. त्यानंतर हे मृतदेह घेऊन बाभूळगाव पोलिसांचा ताफा फाळेगावात पोहोचला. त्यावेळी गावकरी वेशीवर बसून त्यांची वाटच पाहात होते. घटनेच्या दिवशी गावात चुली पेटल्या नाहीत. गायत्री, जय व लहानगी कोमल यांचे मृतदेह पाहून गावातील महिला धाय मोकलून रडत होत्या. शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत रात्री ११.४५ वाजता चौघांवर अंत्यसंस्कार केले.
वडिलांच्या अतिशय रागीट स्वभावामुळे ही तिन्ही मुले कायम दहशतीत असायची, असे गावकऱ्यांनी सांगितले. अंत्यसंस्कार प्रसंगी ठाणेदार हनुमंतराव गायकवाड, सरपंच प्रतिभा पारधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंगची पत्नी व एका इसमाला तात्पुरते ताब्यात घेतले आहे. अधिक तपास केला जात आहे. (प्रतिनिधी)
कारण अद्यापही गुलदस्त्यात
चौघांच्याही शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे. गरिबी, नापिकी, कौटुंबिक कलह अशा विविध मुद्यांच्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. मृत पांडुरंग कोडापे याने उत्कर्ष फायनान्सकडून कर्ज घेतले होते. या आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा आहे का, याही दिशेने वेध घेतला जात आहे. डोक्यावर खूप टेंशन असल्याचे पांडुरंग एक आठवड्यापासून वडिलांना सांगत होता. बाभूळगावातील डॉक्टरकडे त्याने प्रकृती दाखविली. मात्र पैसे नसल्याने तो यवतमाळला जाऊ शकला नाही. या प्रकरणात पती-पत्नीच्या भांडणात एका ‘तो’चा उल्लेख करताना गावकरी आढळून आले. मात्र ‘तो’ कोण हे सांगण्यासाठी कुणीही पोलिसांपुढे आले नाही. पण अद्याप कुणीही तक्रार देण्यासाठी पोलिसांपर्यंत आलेला नाही.