प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी विजय दर्डा यांची फेरनिवड

By Admin | Updated: June 11, 2016 02:44 IST2016-06-11T02:44:25+5:302016-06-11T02:44:25+5:30

येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची शुक्रवारी एकमताने निवड करण्यात आली.

Vijay Darda's re-election as president of Priyadarshini Sahakari Sutagiri | प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी विजय दर्डा यांची फेरनिवड

प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी विजय दर्डा यांची फेरनिवड

संचालक मंडळाची बैठक : उपाध्यक्षपदी कीर्ती गांधी, मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार समस्या
यवतमाळ : येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची शुक्रवारी एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी माजी आमदार कीर्ती गांधी यांची निवड झाली.
प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच अविरोध झाली. यानंतर शुक्रवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सूतगिरणीत संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी खासदार विजय दर्डा यांचे नाव कीर्ती गांधी यांनी सुचविले. त्याला माणिकराव भोयर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खासदार दर्डा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. तर उपाध्यक्षपदासाठी माजी आमदार कीर्ती गांधी यांचे नाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि सूतगिरणीचे संचालक बाळासाहेब मांगुळकर यांनी सुचविले. त्याला उज्ज्वला अटल यांनी अनुमोदन दिले, त्यांची निवडही अविरोध झाली.
निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी सर्व संचालकांना मार्गदर्शन केले. सूतगिरणीच्या खडतर वाटचालीची माहिती विषद केली. ते म्हणाले, शासन नवीन सूतगिरण्यांना सात टक्के व्याजअनुदान आणि भागभांडवलामध्ये १० टक्के मदत करते. हा निकष जुन्या सूतगिरण्यांसाठी मात्र नाही. त्यामुळे जुन्या सूतगिरण्यांना स्पर्धेत टिकणे शक्य होत नाही. त्यातून तोटा वाढत आहे. या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत १० आॅगस्ट २०१५ रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत शासकीय व्याजअनुदान, भागभांडवल, प्रकल्पाचे फेरमुल्यांकन करण्याची मागणी केली. मात्र त्यानंतरही या प्रस्तावाचा शासनातर्फे विचार झाला नाही. सूतगिरणीच्या अडचणी वाढतच आहेत. आता याच मुद्यावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे विजय दर्डा यांनी सांगितले.
या सभेला संचालक किशोर दर्डा, अनिल पालतेवार, डॉ. जाफरअली अकबरअली जीवाणी, संतोषकुमार भूत, प्रकाशचंद छाजेड, संजय पांडे, कैलास सुलभेवार, जयानंद खडसे, डॉ. प्रताप तारक, लीलाबाई बोथरा उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दारव्हाचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रेम राठोड यांनी काम पाहिले. त्यांना उमरखेडचे सहाय्यक निबंधक सुनील भालेराव आणि सुमित ठमके यांनी सहकार्य केले.
आभार संचालक माणिकराव भोयर यांनी मानले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Vijay Darda's re-election as president of Priyadarshini Sahakari Sutagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.