विजय दर्डा : सांसद आदर्श ग्राम योजनेचा घेतला आढावा
By Admin | Updated: March 26, 2021 22:44 IST2015-08-26T02:31:38+5:302021-03-26T22:44:29+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या तमाम योजना या गावात प्राधान्याने पोहोचवा, असे आवाहन खासदार विजय दर्डा यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना केले.

विजय दर्डा : सांसद आदर्श ग्राम योजनेचा घेतला आढावा
केंद्र व राज्याच्या योजना भारी गावात पोहोचवा
यवतमाळ : सांसद आदर्श ग्राम भारीला देशातील ‘मॉडेल व्हिलेज’ बनवायचे असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या तमाम योजना या गावात प्राधान्याने पोहोचवा, असे आवाहन खासदार विजय दर्डा यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना केले.
सांसद आदर्श ग्रामची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. त्यात भारी गावाची लोकसंख्या, घरांची स्थिती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अपंग, शौचालय, पाणीपुरवठा, सिंचन, शेती, पीक परिस्थिती, पशुधन, रस्ते, नाल्या, पथदिवे, कृषीपंपांच्या वीज जोडण्या, घरगुती मीटर, बचत गट, रोहयोची कामे, स्वस्त धान्य, अंगणवाडी, आरोग्य अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.
विजय दर्डा म्हणाले, भारी गावाचा कायापालट करून हे गाव पंतप्रधानांच्या स्वप्नातील सांसद आदर्श गाव बनवायचे आहे. ग्रामीण भागासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहे. या सर्व योजना अधिकाऱ्यांनी प्राधान्याने भारी गावात पोहोचवाव्या. योजनांबाबत गावात व्यापक जनजागृती करावी, शासनाचे उद्देश, योजना याबाबत गावकऱ्यांचे समूपदेशन करावे आणि गावाला खऱ्या अर्थाने गाव आदर्श करावे. या योजनांच्या माध्यमातून घरकूल, घरोघरी नळ कनेक्शन, वीज मीटर, कृषीपंपाला नळ जोडणी, अद्यावत व्यायाम शाळा, सामाजिक भवन, ग्रंथालय, अंगणवाडी, शेतीपूरक जोड धंदे, पशुपालन, लघु उद्योग-रोजगार निर्मिती, शाळा, उद्यानाचे सौंदर्यीकरण केले जाणे अपेक्षित आहे. विकास आणि बदल स्वीकारण्यासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे, त्यांचे समूपदेशन करण्याची आवश्यकता दर्डा यांनी विशद करताना त्यासाठी भारी गावात शासनाच्या विविध विभागांनी नागरिकांच्या सोईने शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना केल्या. अधिकाऱ्यांनी शासकीय निकष व कामकाजाची चाकोरी सोडून भारी गावासाठी स्वत:ला झोकून द्यावे, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून लोक पहायला येतील, एवढे आकर्षण या गावात विकासाच्या माध्यमातून निर्माण करावे, असे आवाहन विजय दर्डा यांनी अधिकाऱ्यांना केले. भारी गावाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांची सुरू असलेली धडपड पाहून हे गाव निश्चित देशातील ‘मॉडेल व्हिलेज’ बनेल, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे विजय दर्डा यांनी यावेळी सांगितले. या दोनही अधिकाऱ्यांच्या कामाच्या धडाडीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
दूरसंचार अधिकाऱ्याची झाडाझडती
सांसद आदर्श ग्राम भारी येथील ग्रामपंचायतीचा दूरध्वनी कित्येक महिन्यांपासून बंद आहे. तेथे मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही, ब्रॉडबॅन्डचीही सोय नसल्याची बाब विजय दर्डा यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर जिल्ह्यात आॅप्टीकल फायबरच्या लाईनचे काम सुरू असून भारीला दुसऱ्या टप्प्यात सन २०१६ मध्ये स्थान दिले जाईल, अशी माहिती सहायक दूरसंचार व्यवस्थापकांनी दिली. ते ऐकून जिल्हाधिकारी जाम भडकले. भारी हे सांसद आदर्श ग्राम असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाने कोणत्याही योजनेस भारीला या गावाला प्राधान्यक्रम देणे गरजेचे असताना या गावाला आॅप्टीकल फायबर सुविधेसाठी वर्षभर थांबविण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करून सिंह यांनी दूरसंचार अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली.

सांसद आदर्श ग्राम भारीच्या विकासासाठी मुंबई येथील आपल्या भगिनी जयश्री भल्ला यांची आर्किटेक्ट म्हणून मदत घेण्याचा मानस विजय दर्डा यांनी बोलून दाखविला. लॅन्ड स्केपिंगमध्येसुद्धा मोठे नाव असलेल्या जयश्री भल्ला यांनी मुंबईच्या विकासाचा आराखडा बनविला आहे. विदेशातही त्यांनी विकास आराखड्यात योगदान दिले आहे. जयश्री यांना आपण भारीचा विकास आराखडा बनविण्यासाठी विनंती केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह येथे उपस्थित अधिकाऱ्यांची तयारी असेल तर त्या भारीच्या विकास आराखड्यासाठी आपले सहकार्य देतील, असे दर्डा यांनी सांगितले.