फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात

By Admin | Updated: July 14, 2016 02:36 IST2016-07-14T02:36:00+5:302016-07-14T02:36:00+5:30

शहरात दुचाकी व चारचाकींच्या निर्माण झालेला महापूर आणि शहरातून जाणाऱ्या वाहनांचा वाढता आलेख अशा परिस्थितील

In view of encroachment on footpath | फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात

फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात

अनधिकृत टपऱ्या : पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
पुसद : शहरात दुचाकी व चारचाकींच्या निर्माण झालेला महापूर आणि शहरातून जाणाऱ्या वाहनांचा वाढता आलेख अशा परिस्थितील सर्वसामान्य पादचाऱ्याला रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. आता तर हक्काचे पदपथही गायब होवू लागले आहेत. ठिकठिकाणी पदपथावर आणि मोक्याच्या ठिकाणी टपऱ्या उभारून दुकानदारी थाटली आहे. वाहतुकीच्या कोंडीला आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या मोहिमेला रोखणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुसद शहरात महत्त्वाचे रस्ते वगळता अंतर्गत रस्ते विकासाला चालना मिळाली नाही. ज्यांनी शहराचे नियोजन करावयाचे अशा नगरसेवकांनीच आपापल्या भागांमध्ये रस्ता रुंदीकरणाला आजपर्यंत कडाडून विरोध केला. यामुळे पुसद शहराची ओळख खड्ड्याचे शहर अशी झाली. गेल्या काही वर्षात रस्ते विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महत्त्वाचे रस्ते रुंद होण्याच्या कामाला गती मिळाली. या रस्त्याकडेला अरुंद का असेनात पण पादचाऱ्यांसाठी पदपथाची व्यवस्था करण्यात आली होती. हे पदपथ सध्या टपऱ्यांनी व्यापू लागले आहेत. कोणीही यावे आणि टपरी टाकावी अशी अवस्था झाली आहे. संबंधित टपऱ्यांचे आश्रयदाते पडद्यामागून ही सारी सूत्रे हलविताना दिसताहेत. या टपरीधारकांकडून भाडेपट्टी आणि संरक्षणाच्या नावाखाली हजारो रुपयांची खंडणी गोळा करण्याचे काम काही गावगुंडांनी आपल्या हाती घेतले आहे. दुर्दैवाने या रस्त्यालगत वेगाने उभारल्या जाणाऱ्या अतिक्रमणांकडे नगरपालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेला लक्ष द्यायला वेळ दिसत नाही. या सर्वांमध्ये शहरात पादचाऱ्यांची सुरक्षितता तर धोक्यात आली आहेच. शिवाय खंडणीच्या रूपाने पुसद शहरात गुन्हेगारीलाही मोठ्या प्रमाणात बळ मिळू लागले आहे. पुसद शहरात फेरफटका मारला तर शहरामध्ये दिवसेंदिवस रस्त्यांकडेला पदपथावर उभ्या राहणाऱ्या अतिक्रमणांची समस्या किती गंभीर होत चालली आहे याची कल्पना येवू शकते. रस्त्यावर पहिला हक्क हा पादचाऱ्यांचा असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असताना शहरात आज सरकारी जागांवर अतिक्रमण काढल्याने आज रस्त्याचा हक्कदार असलेला पादचारी मात्र जीव मुठीत धरून चालताना दिसतो आहे. तेव्हा प्रशासनाला केव्हा जाग येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: In view of encroachment on footpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.