जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गज आले अडचणीत
By Admin | Updated: October 13, 2016 00:39 IST2016-10-13T00:39:38+5:302016-10-13T00:39:38+5:30
जिल्हा परिषदेच्या ६१ गटांची नव्याने फेररचना करण्यात आली. या फेररचनेत अनेक दिग्गजांना फटका बसला.

जिल्हा परिषद निवडणुकीत दिग्गज आले अडचणीत
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ६१ गटांची नव्याने फेररचना करण्यात आली. या फेररचनेत अनेक दिग्गजांना फटका बसला. त्यांनी आत्तापासूनच पर्यायी मतदार संघाची शोधाशोध सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेत आता ६२ ऐवजी ६१ गट राहतील. नव्याने सहा नगरपंचायती निर्माण झाल्याने सहा गावे वगळून हे गट तयार करण्यात आले आहे. परिणामी काही गावांची गटबदली झाली. पूर्वीच्या मतदार संघातील काही गावे नवीन गटात समाविष्ट झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे गटही नव्याने अस्तित्वात आले आहे. सर्वच गटात थोडाफार बदल झाला आहे. त्यातच आता आरक्षणही बदलले. या बदलामुळे दिग्गजांची मोठी पंचाईत झाली आहे.
जिल्हा परिषदेत बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, ययाती नाईक, सुभाष ठोकळ, नरेंद्र ठाकरे, देवानंद पवार, प्रकाश कासावार, मनमोहनसिंग चव्हाण आदी दिग्गज सदस्य आहेत. यापैकी केवळ नरेंद्र ठाकरे यांना आरक्षणाने दिलासा मिळाला.
उर्वरित सदस्यांना नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यांचे विद्यमान मतदार संघ आरक्षित झाल्याने दुसरीकडे मोर्चा वळवावा लागणार आहे. यात प्रकाश कासावार यांची फारच अडचण झाली. त्यांना जिल्हा परिषदेत पोहोचण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातच जावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)