Ventilator fell in Pusad Sub-District Hospital | पुसद उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर पडले धूळखात

पुसद उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर पडले धूळखात

पुसद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने अनेकांना प्राण गमावण्याची वेळ आली. या स्थितीत येथील उपजिल्हा रुग्णालयात तब्बल १० व्हेंटिलेटर धूळखात पडले आहेत. याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक साकीब शाह यांनी केली आहे.

वेळीच रुग्णाला औषध न मिळणे, रक्ताचा पुरवठा न होणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन आदींच्या अभावामुळे कोरोना रुग्णांसह इतरही रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, येथील आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार ॲड. नीलय नाईक यांनी लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करू नये, ही शोकांतिका असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

मागील काळात येथे रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे उपचारात अडथळा होऊन रुग्णांचे प्राण धोक्यात आले होते. आता पुन्हा त्याच इंजेक्शनची कमतरता भासत आहे. आता रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटल पूर्णत: हाऊसफुल झाले आहे. शहरात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याच्या कारणावरून अनेक रुग्णांना दुसरीकडे जावे लागत आहे. व्हेंटिलेटर नसल्याने डॉक्टरसुद्धा हताश झाले आहेत. त्यांना रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागते; परंतु उपचारासाठी आवश्यक व्हेंटिलेटरसारखी यंत्रसामग्री कमी पडत असल्याने त्यांना रुग्णाचा जीव वाचविता येत नाही. अशात येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वाॅर्डमध्ये मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर धूळखात पडले आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असताना खासगी दवाखाने भरून गेले आहेत. गोरगरिबांना त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. एवढेच नव्हे, तर अनेकांचे प्राण गेल्याचे व जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार अधिकारी व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पंतप्रधान निधीमधून अनेक महिन्यांपासून १० व्हेंटिलेटर पुरविले असतानासुद्धा अद्याप त्याचा वापरच झाला नाही. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्या व्हेंटिलेटर्सचा उपयोग रुग्णाचे जीव वाचविण्यासाठी करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेवक साकिब शाह यांनी दिला आहे.

कोरोना रुग्णांची दररोजची वाढती रुग्णसंख्या पाहू जाता गरीब रुग्णांना यवतमाळ येथे जावे लागते. मात्र, यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात जाईपर्यंत प्राण जाण्याच्या घटना घडत आहेत. खासगी दवाखान्यात बेड उपलब्ध नसल्याच्या कारणाने त्यांना हाकलले जात असल्याची परिस्थिती आहे. गरीब रुग्णांवर उपचार करण्यास मनाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाढते मृत्यू रोखण्यासाठी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात कोरोना उपचार केंद्राची निर्मिती करून गोरगरीब रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणीसुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह शासन, प्रशासनाकडे केली आहे.

बॉक्स

येथील उपजिल्हा रुग्णालयाला अकोला व यवतमाळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व केंद्रीय समितीच्या चमूने भेट दिली. त्यावेळी व्हेंटिलेटर व रक्त साठवणूक केंद्राबाबत येथील अधिकारी व डॉक्टरांनी माहिती दिली नाही. ही बाब लपवून ठेवली. त्यामुळे रुग्णाच्या जिवाशी खेळ करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक साकीब शाह यांनी केली आहे.

कोट

तीन-चार महिन्यांपूर्वी पीएमफंडातून १० व्हेंटिलेटर मशीन उपजिल्हा रुग्णालयालयाला मिळाल्या. त्यापैकी पाच व्हेंटिलेटर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयाला पाठविले जाणार आहेत. येथे एमडी डॉक्टर नसल्याने व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले नाही. पुसदला मोबाइल एक्स रे मशीन आली आहे. आता सर्व भरती कोरोना रुग्णांचे एक्स रे काढण्यात येणार आहे. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक आहे. बेडची व्यवस्थापण मुबलक आहे.

डॉ. हरिभाऊ फुपाटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पुसद.

Web Title: Ventilator fell in Pusad Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.