वणीत वाहतूक विभागाकडून कारवाईचा धडाका
By Admin | Updated: June 9, 2017 01:48 IST2017-06-09T01:48:19+5:302017-06-09T01:48:19+5:30
गेल्या काही महिन्यापासून विस्कळीत झालेल्या वणी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून

वणीत वाहतूक विभागाकडून कारवाईचा धडाका
वाहतुकीला शिस्त लावणार : बाजारपेठेतील मार्ग केले मोकळे, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या काही महिन्यापासून विस्कळीत झालेल्या वणी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून येथील वाहतूक शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. येथे नव्यानेच रुजू झालेले वाहतूक निरीक्षक संग्राम ताटे यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून वणी शहरातील वाहतूक व्यवस्था पार विस्कळीत झाली होती. बेशिस्त वाहतुकीमुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मिळेल त्या वर्दळीच्या ठिकाणी वाहने उभी केली जात होती. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत असे. मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. दुकानातील साहित्य वाहतुकीच्या रस्त्यावर ठेवण्यात येत आहेत. अगोदरच बाजारपेठेतील रस्ते चिंचोळे असल्याने नागरिकांना या रस्त्याने जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच वाहतुकीच्या अनेक समस्या शहरात आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे वाहतूक पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून वणी शहरात बेशिस्त वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांविरुद्ध कलम २७९ अन्वये कारवाई करण्यात आली. २० अवैैध वाहतुकदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दोन धूम स्टाईल बायकर्सविरुद्धही कारवाई करण्यात आली.
रुजू होताच, स्वत: वाहतूक पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील गांधी चौैकातील गांधी पुतळ्यासमोर रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जात होती. ऐन गर्दीच्यावेळी या ठिकाणी दुचाकींची गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन त्या ठिकाणी वाहतूक पोलीस शिपायाची नियुक्ती करून तेथे वाहन उभे करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत तेथे वाहने उभी करणे बंद झाले आहे. स्वत: ताटे यांनी व्यापारपेठेत जाऊन रस्त्यावर दुकानातील साहित्य ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना समज देऊन यापुढे रस्त्यावर साहित्य न ठेवण्याबद्दल बजावले. पूर्वी वाहतूक पोलीस शिपाई आडोशाला उभे राहून वाहनधारकांविरुद्ध कारवाई करीत होते. मात्र यापुढे नेमून दिलेल्या ठिकाणीच उभे राहून वाहतूक शिपाई कारवाई करणार असल्याचे ताटे यांनी सांगितले.
वॉटर कॅन वितरकांना वेळेचे बंधन
शहरात मोठ्या प्रमाणावर कॅनमधील पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यात येतो. या कॅन वाहनाद्वारे पोहचविल्या जातात. व्यापारपेठेतील दुकानदारांकडेदेखील या कॅन पोहचविल्या जातात. हे कॅन वितरक बाजारपेठेत कोणत्याही वेळी रस्त्यावर वाहने उभी करून कॅनचे वितरण करीत होते. मात्र आता त्यांना सकाळी ११ वाजताच्या अगोदरच बाजारपेठेत कॅनचे वितरण करावे लागणार आहे. वाहतूक शाखेने सर्व कॅन वितरकांना नोटीस देऊन वेळेचे पालन करण्याबाबत बजावले आहे.