भाजीपाला गडगडला
By Admin | Updated: August 22, 2016 01:07 IST2016-08-22T01:07:38+5:302016-08-22T01:07:38+5:30
उन्हाळा आणि त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला गगणाला भिडलेले भाजीपाल्यांचे दर आतामात्र बऱ्यापैकी उतरले आहेत.

भाजीपाला गडगडला
गृहिणींना दिलासा : टमाटर, काकडी, कांदे १० रूपये किलो
यवतमाळ : उन्हाळा आणि त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला गगणाला भिडलेले भाजीपाल्यांचे दर आतामात्र बऱ्यापैकी उतरले आहेत. सध्या भाजीपाल्याला पोषक असे वातावरण असल्यामुळे उत्पादन वाढून बाजारात आवक वाढली आहे. सहाजिकच दरही कमी झाले. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असला तरीदेखील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चांगलाच तोटा सहन करावा लागत आहे.
आवक वाढताच बाजारपेठेत भाज्यांचे भाव गडगडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. काही शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला गुरांच्या गोठ्यात नेण्यास सुरूवात केली आहे. या स्थितीत शेतमालास संरक्षण न मिळाल्यास भविष्यात भाजीपाल्याचे क्षेत्र कमी होऊन शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढणार आहे. खरिप हंगामात शेतकरी सर्वाधिक अडचणीत असतो. जवळचे सर्व पैसे संपलेले असतात. या स्थितीत तत्काळ पैसे मिळावे म्हणून शेतकरी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यातून कीटकनाशकाची फवारणी करता यावी आणि खताचे व्यवस्थापन करता यावे, हा मुख्य उद्देश असतो. घरखर्च भागविण्यासाठी पैसे वापरले जातात. मात्र यावर्षी चित्र विपरित आहे.भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली घसरले आहेत. यामुळे भाजीपाल्याचा लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. भाजीपाला तोडण्यासाठी लागणारी मजुरीही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी गुरांसाठी चारा म्हणून आपली जनावरे भाजीपाल्यात सोडली आहेत. तर दुधाळ जनावरासाठी ढेपेऐवजी भाजीपालाच लावला जात आहे. (शहर वार्ताहर)