यवतमाळ : उन्हाळा सुरु झाला की राज्यात दरवर्षी पाण्यासाठी होणारी पायपीट आपल्याला दिसते. पण राज्यात सर्वात जास्त उन्हाच्या कळा सोसणारा विदर्भातील 'हर घर जल' योजनेचे वास्तव काय आहे हे निदर्शनास आणून देणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कठोडा गावात घडली. पारधी वस्तीत राहणारी १२ वर्षांची वेदिका सुरेश चव्हाण हिला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला. वेदिका नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा अरुणावती नदीत बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आर्णी तालुक्यातील कठोडा येथे पारधी वस्तीमधील वेदिका नेहमीप्रमाणे पाण्यासाठी नदीवर गेली पाय घसरून ती नदीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समोर येताच परिसरात शोककळा पसरली. कठोडा गावाजवळील पारधी वस्तीत आजही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महिलांना आणि मुलांना पाण्यासाठी रोज नदीकाठी जावं लागतं. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' योजना 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेत कठोडा वस्तीचा समावेश असूनही, प्रत्यक्षात एकही घर पाण्याने जोडलेलं नाही.
कठोडा गावात फक्त एक हातपंप असून तो संपूर्ण गावासाठी अपुरा आहे. या घटनेमुळे काठोडा गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण गावकऱ्यांपर्यंत पाणी आलंच नाही. मग हे पैसे गेले कुठे?” अशे प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. वेदिकाच्या मृत्यूला थेट प्रशासन जबाबदार असल्याचं नातेवाईक आणि गावकरी म्हणत आहेत.
आर्णी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या वस्तीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, एक निष्पाप जीव गमावल्यावर प्रशासनाला जाग येते, ही बाब दुर्दैवी आहे.