चापडोहचे मतदार नगरपरिषदेच्या यादीत
By Admin | Updated: October 19, 2016 00:38 IST2016-10-19T00:38:40+5:302016-10-19T00:38:40+5:30
शहरालगतच्या चापडोह पुनर्वसन येथील ३५० नागरिकांची नावे चक्क यवतमाळ नगरपरिषदेच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.

चापडोहचे मतदार नगरपरिषदेच्या यादीत
सीओंनी मागितला पुरावा : ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार बेदखल
यवतमाळ : शहरालगतच्या चापडोह पुनर्वसन येथील ३५० नागरिकांची नावे चक्क यवतमाळ नगरपरिषदेच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. ही बाब उघड होताच एकच खळबळ उडाली. यामुळे धास्तावलेल्या चापडोह ग्रामपंचायत सदस्यांनी सीओंकडे तक्रार केली. मात्र ही तक्रार निकाली काढताना चौकशीऐवजी तक्रारकर्त्यांनाच पुरावे सादर करण्याचा आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या यादीचे प्रारूप प्रसिद्ध करून आक्षेप मागविण्यात आले. मात्र यातील चुकांमुळे हजारांच्यावर आक्षेप दाखल झाले. आता हे आक्षेप निकाली काढतानासुद्धा झालेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रकार नगरपरिषदेत सुरू आहे. शहराच्या भोसा परिसराला लागून असलेल्या चापडोह पुनर्वसन येथील ३५० नागरिकांची नावे कोणत्याही सर्व्हेक्षणाशिवाय थेट नगरपरिषद मतदार यादीत समाविष्ठ करण्यात आली. गावातील ४२५ मतदारांपैकी ३५० नावे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये दाखविण्यात आली आहे.
या प्रतापामुळे चापडोह ग्रामपंचायतीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही बाब कळताच येथील सरपंच व ग्रामस्थांना धक्काच बसला. त्यामुळे सरपंच दत्ता बावणे, सदस्य विनोद केराम, पुष्पा फुपरे, सुशिला कोवे यांनी चापडोह येथील सर्व्हे नंबर ९४,९५ आणि ९६ यांचा सातबारा पुराव्या दाखल तक्रारीसोबत जोडून सीओकडे तक्रार केली. अशीच तक्रार मनवर शहा यांनीसुद्धा दिली आहे. या तक्रारीवर सुणावणीत सीओंनी चक्क पुरावे सादर करण्याचे आदेश दिले.
शहरी भागातसुद्धा प्रभाग २० मधील २५० मतदारांची नावे प्रभाग दहामध्ये जोडली आहे. केवळ काही व्यक्तींच्या राजकीय सोयीसाठी नियमबाह्य काम होत असून तक्रारींची दखल घेतली जात नाही, असा आरोप आता करण्यात आला आहे. या प्रकरणात योग्य न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मनवर शहा यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)