‘वसंत’ची १६ कोटींची कर्ज वसुली वांद्यात
By Admin | Updated: February 9, 2016 02:05 IST2016-02-09T02:05:24+5:302016-02-09T02:05:24+5:30
पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचा पट्टा अवघ्या १९ व्या दिवशी पडल्याने या कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या १६ कोटींच्या कर्जाची वसुली वांद्यात सापडली आहे.

‘वसंत’ची १६ कोटींची कर्ज वसुली वांद्यात
जिल्हा मध्यवर्ती बँक : कर्ज मंजुरीसाठी बँक संचालकांना केले ‘खूश’, पुसदचाही दबाव
यवतमाळ : पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचा पट्टा अवघ्या १९ व्या दिवशी पडल्याने या कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या १६ कोटींच्या कर्जाची वसुली वांद्यात सापडली आहे.
प्रकाश पाटील देवसरकर अध्यक्ष असलेला वसंत सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुमारे तीन महिने विलंबाने सुरू झाला. पर्यायाने कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांकडे आणि विशेषत: मराठवाड्याकडे गेला. १७ जानेवारी २०१६ रोजी वसंत कारखाना सुरू झाला आणि ५ फेब्रुवारीला बंद पडला. या १९ दिवसात केवळ १३ हजार ६०० टन उसाचे गाळप झाले. कारखान्याच्या गेल्या ४० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे कमी गाळप झाल्याचे सांगितले जाते. त्यातून दहा हजार पोते साखरेची निर्मिती झाली. या कारखान्याने कधी काळी साडेचार ते पाच लाख टन ऊस गाळपाचाही रेकॉर्ड नोंदविला आहे. यावर्षीसुद्धा सुमारे अडीच लाख टन ऊस गाळपाची अपेक्षा होती. मात्र राजकारणापायी संपूर्ण नियोजनच कोलमडले. केवळ १९ दिवस कारखाना चालल्याने कर्जाची वसुलीही होणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली.
वसंत सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने ५२ कोटी रुपये एकूण कर्ज दिले आहे. त्यातील काही कर्जाची वसुली झाली. त्यानंतर पुन्हा नुकतेच १६ कोटी रुपये कर्ज दिले. वास्तविक ठराव हा १३ कोटींचाच झाला होता. त्यानंतरही अतिरिक्त तीन कोेटींसह १६ कोटी रुपये कर्ज दिले गेले. वसंत कारखान्याला कर्ज देण्यास काही संचालकांचा विरोध होता. या कर्जासाठी संचालकांना ‘खूश’ केले गेल्याचे सांगितले जाते. शिवाय या कर्जाला कुणी विरोध करू नये म्हणून पुसदमधून खास प्रत्येक संचालकाशी संपर्कही केला गेला. मात्र काही संचालकांनी पुसदमधील हे ‘श्रेष्ठत्व’ नाकारून वसंतच्या कर्जाला आपला विरोध कायम ठेवला. या १६ कोटींच्या कर्जाची वसुली कशी करावी याचा पेच बँकेपुढे आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्यात असलेली ३३ हजार पोते साखरेचे तारण पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात कारखान्याच्या गोदामात २७ हजार पोतेच साखर असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. विशेष असे कारखान्याकडील थकीत कर्जाची वसुली करताना पहिला दावा शासनाचा असतो. नंतर राज्य सहकारी बँक व त्यानंतर कुठे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कर्ज वसुलीसाठी नंबर लागतो. बँकेच्या आवाक्याबाहेरील कर्जाचे असे डझनावर नमुने उपलब्ध आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)