वसंतराव नाईक पुतळा सौंदर्यीकरण रखडले
By Admin | Updated: September 8, 2016 01:08 IST2016-09-08T01:08:18+5:302016-09-08T01:08:18+5:30
जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे.

वसंतराव नाईक पुतळा सौंदर्यीकरण रखडले
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. आर्थिक तरतूद करूनही सौंदर्यीकरण रखडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हरित क्रांतीचे प्रणेते, जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा जिल्हा परिषदेच्या सौंदर्यात भर घालत आहे. तो पदाधिकारी, सदस्यांसह नागरिकांना प्रेरणा देत आहे. या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. त्यासाठी तब्बल २५ लाख रूपयांची देखभाल व दुरूस्तीसाठी तरतुदही करण्यात आली होती. सेस फंडातून प्राप्त निधीतून ही तरतूद करण्यात आली होती. मात्र निधीची तरतूद होऊनही अद्याप पुतळा सौंदर्यीकरणाच्या कामाने वेग घेतला नाही. मागील स्थायी समितीच्या बैठकीत दिवाकर राठोड यांनी पुतळा सौंदर्यीकरणाचे काम कुठवर आले, त्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली, अशी पृच्छा केली होती. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच बांधकाम विभाग क्रमांक एकच्या अधिकाऱ्यांना सौंदर्यीकरणाचे काम आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही पुतळा सौंदर्यीकरणाला प्रत्यक्षात सुरूवातच झाली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पदाधिकारी व सदस्यांसह जिल्हा परिषदेत येणाऱ्या सामान्य नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)