वणीत बिल्डरांचं चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:30 PM2019-03-17T22:30:43+5:302019-03-17T22:31:04+5:30

शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे.

Vanity Builders Have Good | वणीत बिल्डरांचं चांगभलं

वणीत बिल्डरांचं चांगभलं

googlenewsNext
ठळक मुद्देखुलेआम रेती पुरवठा : घुग्गुस येथून टिप्परद्वारे आणली जाते वाळू

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे. परंतु या सर्व प्रकाराकडे वणीच्या महसूल विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
सध्यास्थितीत तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव न झाल्यामुळे रेतीचा उपसा बंद आहे. आता हे रेतीघाट लिलाव करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. मात्र वणी परिसरातील रेती घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस येथील रेती तस्कर बिनधास्तपणे वणीत रेती आणून ती बिल्डरांना विकत आहे. गेल्या १२ मार्च रोजी वणी येथील बसस्थानकासमोरून एका टिप्परमधून चोरट्या मार्गाने रेती नेली जात होती. याबाबत तलाठी समाधान पाटील यांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी या वाहनाचा पाठलाग करून टिप्परला अडविले. या टिप्परची झडती घेतली असता, आतमध्ये तीन ब्रास रेती आढळून आली. त्यामुळे हे टिप्पर ताब्यात घेऊन संबंधित टिप्पर मालकाला तहसीलदारांनी दोन लाख ७५ हजार ९२० रूपयांचा दंड ठोठावला होता. वणी परिसरा हा क्षेत्रफळाने मोठा असून अनेक ठिकाणी बिल्डींगचे कामे सुरू आहे. तसेच शहरात अनेक शासकीय कामे मंजूर आहेत. मात्र हे काम सुरू करण्यासाठी रेतीच मिळत नसल्यामुळे सध्या हे काम ठप्प पडले आहे. परंतु बिल्डरांना मात्र बांधकामासाठी रेती कशी काय उपलब्ध होत आहे, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वर्धा नदीच्या पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रात्री १० ते पहाटेपर्यंत रेतीचा उपसा करून ती रेती वणी शहरात आणण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत महसूल विभाग अद्यापही मूग गीळून बसला आहे. १२ मार्च रोजी पकडलेल्या टिप्पर मालकाचा शोध घेऊन या रेती तस्करीच्या मुळाशी पोहोचले असते, तर अनेक तस्करांविरूद्ध कारवाई झाली असती. मात्र महसूल विभागाने केवळ दंड वसुल करण्यातच समाधान मानले.
गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न अद्यापही अधुरेच
वणी तालुक्यातील रेतीघाटांचा अद्यापही लिलाव करण्यात आला नाही. तालुक्यातील अनेक गोरगरिबांना व सर्वसामान्यांना शासनातर्फे घरकुल मंजुर करण्यात आले आहे. मात्र रेतीच नसल्यामुळे घर बांधायचे तरी कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही घरकुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. तसेच रेतीचे दर वाढविल्यामुळे ती रेती घेणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे.

Web Title: Vanity Builders Have Good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू