वणी तालुक्यातील विदर्भा नदीचे खोरे झाले विषाक्त
By Admin | Updated: November 16, 2016 00:37 IST2016-11-16T00:37:51+5:302016-11-16T00:37:51+5:30
तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीत लगतच्या कुंभारखणी कोळसा खाणीतून निघणारे दूषित पाणी सोडण्यात येत आहे.

वणी तालुक्यातील विदर्भा नदीचे खोरे झाले विषाक्त
वेकोलिची मुजोरी : घोन्सासह परिसरातील नदीकाठावरील गावांना होतोय रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा
वणी : तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीत लगतच्या कुंभारखणी कोळसा खाणीतून निघणारे दूषित पाणी सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे तालुक्यातील विदर्भा नदीचे खोरे विषाक्त झाले आहे. सोबतच कोळसा खाणीतून सोडण्यात येणाऱ्या या रसायनयुक्त पाण्याचा नदीकाठावरील गावांना पुरवठा होत असल्यामुळे एखाद्याला जीव गमावण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील घोन्सा लगत गेल्या १२ वर्षांपूर्वी कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीची निर्मिती करण्यात आली. तेव्हा कोळसा काढताना निघणारे रसायनयुक्त व दूषित पाणी विदर्भा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु हे पाणी शुद्ध करून सोडण्यात यावे, या अटीवर ग्रामपंचायतीने नदीत पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. सुरूवातीला काही वर्ष वेकोलिने पाणी शुद्ध करून नदीत सोडले. मात्र आता गेल्या वर्षभरापासून पुन्हा वेकोलि प्रशासनाने रसयानयुक्त व दुषित पाणी सोडणे सुरू केले आहे.
दुपारी हे पाणी सोडताना ग्रामस्थांच्या दृष्टीस पडेल म्हणून वेकोलि प्रशासनातर्फे रात्रीच्या वेळेला पाणी सोडण्यात येत आहे. याबाबत गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रयोगशाळा तंत्रज्ञाने पाण्याचे नमूने घेतले होते. तसेच हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवालसुद्धा वेकोलि व ग्रामपंचायत प्रशासनाला दिला होता.
त्यामुळे वेकोलिने पुन्हा काही दिवस पाणी शुद्ध करून नदीत सोडणे सुरू केले. या पाण्यामुळे नदीच्या जलस्त्रोत वाढसुद्धा झाली होती. परंतु आता पुन्हा वेकोलि प्रशासनातर्फे ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळ फेकत रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परिणामी घोन्सावासीयांसह परिसरातील गावकऱ्यांना हे रसायनयुक्त व दूषित पाणी प्यावे लागत आहे.
तसेच याच विदर्भा नदीतून परिसरातील नदीकाठावरील गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात सापडले आहे. या पाण्यामुळे जर एखाद्याला जीव गमवावा लागला, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र वेकोलि प्रशासन आपले मुजोरी धोरण सुधारण्यास अद्यापही तयार नाही.
गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी घोन्सा ग्रामपंचायतीने पाण्याचा जलस्त्रोत वाढावा, या उद्देशाने लोकसहभागातून या नदीची साफसफाई करून खोलीकरण केले होते. मात्र या दूषित पाण्यामुळे संपूर्ण नदी आता काळीभोर झाली आहे. त्याचबरोबर या नदीत काही जनावरेसुद्धा पाणी पित असून त्यांचेही आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच आता या प्रकरणाची चौकशी करून वेकोलिविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वेकोलिने केली ग्रामपंचायतीची दिशाभूल
गेल्यावर्षी वेकोलिने वाढीव क्षेत्रासाठी घोन्सा येथील ग्रामपंचायतीकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेऊन आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ना हरकत प्रमाणपत्र मिळताच वेकोलिने आश्वासनाकडे पाठ फिरविली आहे. गावात सुरू असलेले पाण्याच्या टाकीचे काम गेल्या वर्षभरपासून रेंगाळले आहे. तसेच पथदिवे व रस्त्याची समस्या अद्यापही कायम आहे. याबाबत एब एरिया मॅनेजर ढोले यांच्यासोबत उपसरपंच अनिल साळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे, सरपंच निरूपमा पथाडे, पांडुरंग निकोडे, अनंता कामकटकर व ग्रामपंचायत सदस्यांनी एक तास चर्चा करून मागण्या सोडविण्याची विनंती केली होती. मात्र एक महिन्याच्या कालावधी लोटूनही वेकोलिने आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे वेकोलिने ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याचा आरोप उपसरपंच अनिल साळवे यांनी केला आहे.