वणीत चौथ्यांदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
By Admin | Updated: August 30, 2015 02:14 IST2015-08-30T02:14:21+5:302015-08-30T02:14:21+5:30
राष्ट्रीय पातळीवर शिक्षकांना देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद शाळा मोहोर्लीचे शिक्षक रमेश बोबडे यांना जाहीर झाला आहे.

वणीत चौथ्यांदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
बोबडे ठरले चौथे मानकरी : एकाच शाळेला मिळाला दुसऱ्यांदा बहुमान
वणी : राष्ट्रीय पातळीवर शिक्षकांना देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद शाळा मोहोर्लीचे शिक्षक रमेश बोबडे यांना जाहीर झाला आहे. तालुक्यात चौथ्यांदा हा पुरस्कार मिळत आहे, तर मोहोर्लीच्या जिल्हा परिषद शाळेला दुसऱ्यांदा हा बहुमान मिळत आहे.
आपल्या सेवाकाळामध्ये विविध उपक्रमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला राज्य व राष्ट्रीय स्तरावर गौरविले जाते. त्यामधील राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार रमेश बोबडे या उपक्रमशील शिक्षकाला जाहीर झाला आहे. त्यांना ५ सप्टेंबरला दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले जाणार आहे.
यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार येथील नगरपरिषद शाळेचे शिक्षक म.ता. राजूरकर, महावीर हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक बतरा, तर मागीलवर्षी जिल्हा परिषद शाळा मोहोर्लीच्या मुख्याध्यापिका शेख यांना मिळाला आहे. सलग दुसऱ्याही वर्षी मोहोर्लीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने हा पुरस्कार पटकाविला आहे. रमेश बोबडे यांना यापूर्वी स्काऊट गाईडचा जिल्हा पुरस्कार मिळाला आहे. ते उपक्रमशील शिक्षक म्हणून सवत्र परिचित आहे. त्यांच्या उपक्रमांमध्ये, स्वच्छता दूत, तंबाखू नियंत्रण, योगासने, प्राणायाम, संस्कार शिबिर, स्काऊट गाईड व कब-बुलबुल मेळावे, अंधश्रद्धा निर्मूलन, उन्हाळी छंद वर्ग, निर्मलग्राम व निर्मल शाळा उपक्रम, विविध स्पर्धा, वनराई बंधारे, व्यक्तिमत्व विकास व समाज प्रबोधन, हात धुवा दिन उपक्रम, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांची नवोदय व शिष्यवृत्तीची तयारी, पल्स पोलीओ या उपक्रमांचा समावेश आहे.
बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड व कब-बुलबुलच्या ३८ विद्यार्थ्यांची राज्य आणि १८ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांनी कृती संशोधनही केले. तसेच शाळेत हस्तलिखीत तयार केले, तर लोकसहभागातून वर्गणी गोळा करून स्काऊट गाईड भवनास तब्बल एक लाख २५ रूपये उपलब्ध करून दिले. विविध मेळावे, क्रीडा स्पर्धा, माझी समृद्ध शाळा, साक्षरता अभियान, मोहोर्ली येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे उपक्रम त्यांच्या पुढाकाराने पार पडले.
नुकतीच त्यांची मोहोर्ली ही शाळा तंबाखुमूक्त ठरल्याने त्या शाळेला जिल्हास्तरावर गौरविण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बोबडे यांच्या उपक्रमांना पावती
उपक्रमशील शिक्षक बोबडे यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या सर्व उपक्रमांना मिळालेती ती पावती ठरली आहे. धडपड्या शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाटी ते नेहमीच तत्परर असतात. सर्व उपक्रमात त्यांचा मोलाचा वाटा असतोच. अशा या उपक्रमशील शिक्षकाला शिक्षक दिनी राजधानी दिल्लीत सपत्नीक गौरविले जाणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, माजी गटशिक्षणाधिकारी जी.एस.खोले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी वामन मेश्राम व स्काऊट गाईडच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.