जिल्हा परिषदेत काढले प्रशासनाचे वाभाडे
By Admin | Updated: June 13, 2015 02:31 IST2015-06-13T02:31:02+5:302015-06-13T02:31:02+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने विरोधकाकडून प्रशासनाला कोंडीत पकडले जाते.

जिल्हा परिषदेत काढले प्रशासनाचे वाभाडे
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने विरोधकाकडून प्रशासनाला कोंडीत पकडले जाते. मात्र शुक्रवारी झालेल्या सभेत सत्ताधारी सदस्यांनीच विशेष करून राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधकाची भूमिका बजावली. प्रत्येक मुद्यावर अधिकाऱ्यांना कोंडीत पकडून चांगला घाम फोडला.
जिल्हा परिषदेतील अडीच वर्षाच्या काळात ययाती नाईक यांनी अपवादानेच युक्तिवाद केला. मात्र शुक्रवारच्या सभेत त्यांनी थेट सीईओ डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनाच लक्ष्य केले. सीईओंच्या पुसद दौऱ्यावरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी अमोल राठोड यांनी देऊळगाव येथेच सर्वाधिक ४८ घरकूल का मंजूर केले, कमी गुण असलेल्यांना घरकूल दिले तर अधिक गुण असलेल्या लाभार्थ्यांना डावलले, असा आरोप केला. घरकुलाचे वाटप आर्थिक देवाण-घेवाणीतून होत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. या शिवाय कृषी विभागाच्या विशेष घटक योजनेचे लाभार्थी निवडसुद्धा पैशांनी केली जाते. सधन कुटुंबातील तीन व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात आला. अशी अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी सभागृहासमोर मांडले. यावर कृषी विकास अधिकाऱ्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. हरियाली योजनेतील अपहाराचेही चौकशी करतो, असे सांगून कोणतीच कारवाई झाली नसल्याचे राठोड यांनी निदर्शनास आणून दिले.
ययाती नाईक यांनी जिल्हा परिषदेकडून पुरविण्यात आलेल्या माहितीवरच आक्षेप घेतला. कुठलेही सही शिक्के नसलेले दस्तावेज पुरविण्यात आले, हे खरे मानायचे का, असा प्रश्न उपस्थित केला. याच सुरात सूर मिसळून बोलताना ढाणकीचे सदस्य वसंत चंद्रे यांची जीभ घसरली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावही निर्माण झाला होता. प्रवीण देशमुख आणि राकेश नेमवार यांनी हिंदी पदविका असलेल्या ग्रामसेवकांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित केला. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यावर कोणती कारवाई केली, असा जाब विचारण्यात आला. त्याचेही समर्पक उत्तर प्रशासनाकडे नव्हते. शिक्षण विभागाच्या मुद्यावरून पुन्हा सदस्य चांगलेच संतापले. (कार्यालय प्रतिनिधी)