१६ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य प्रशासनापुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST2021-06-25T05:00:00+5:302021-06-25T05:00:20+5:30
जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य यंत्रणेला पूर्ण करता आले नाही.

१६ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य प्रशासनापुढे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. यानंतरही जिल्ह्याला पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध झाली नाही. यामुळे आतापर्यंत केवळ २२ टक्के लसीकरण जिल्ह्याला पूर्ण करता आले आहे. अद्यापही ७८ टक्के लसीकरण बाकी आहे. या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून १६४ केंद्रांची निर्मिती करण्यात आली. आता लस उपलब्ध झाली तरच लसीकरण पुढे नेता येणार आहे. १६ लाख नागरिकांना लस देण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे आहे.
जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण आरोग्य यंत्रणेला पूर्ण करता आले नाही.
दर आठवड्याला ४० ते ५० हजार लस उपलब्ध झाली, तर लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, दर आठवड्याला १८ ते २० हजार लस जिल्ह्याला उपलब्ध होत आहे. त्यातही कोव्हॅक्सिनचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे अनेकांना लसीकरण करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या आठवड्यात प्रथमच ३२ हजार लस जिल्ह्याकरिता पाठविण्यात आली आहे. याच पद्धतीने लस पाठविण्याची तसदी आरोग्य मंत्रालयाने घेतली तरच जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढणार
आहे.
काही दिवसांपूर्वी ३० ते ४४ वयोगटांतील लसीकरणाची मोहीम दहा केंद्रांवर हाती घेण्यात आली होती. आता मंगळवारपासून १८ ते ४० आणि त्यापुढील सर्वच वयोगटाचे लसीकरण करण्याच्या सूचना धडकल्या आहेत. नवीन सूचनेनुसार जिल्ह्यातील १६४ केंद्रांवर लसीकरण मोहीम पुढील काही दिवसांत राबविली जाणार आहे. मंगळवारपासूनच जिल्ह्यातील केंद्रांवर गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दुर्गम भागात अजूनही गैरसमज
- जिल्ह्यातील दुर्गम भागात लस घेण्यासाठी नागरिक अजूनही पुढे येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विविध मोहीम हाती घेतल्या आहे. जाणीवजागृती करण्याचे काम राबविले जात आहे. मात्र, त्याला पाहिजे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येते.