लोकमत न्यूज नेटवर्क वणी : शाळेत विद्यार्थ्यांना शिकविताना मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत अनेक शाळांत शिक्षक सर्रास मोबाइलचा वापर करताना दिसून येत आहेत. यामुळे अध्यापनावर परिणाम होत आहे. तेव्हा शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन या प्रकाराला निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
मोबाईलचे फॅड हे सर्वांनाच लागले असून या मोबाईलवरून आता केवळ संपर्कच साधता येत नाही, तर विविध प्रकारच्या साईटस् मोबाईलवरच उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येकजण मोबाईलचा वापर करून आपली कामे करू लागला आहे. यामध्ये शिक्षकवर्गसुद्धा मागे राहिला नसल्याने अनेक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविताना आता शिक्षकवर्ग मोबाईलमधील विविध साईटस् उघडून करमणूक तसेच एकमेकांना संपर्क करून आपली कामे किंवा शाळाबाहेरील आपले अन्य व्यवसाय ऑन ड्युटी ऑनलाईन करू लागल्याने त्यांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याबाबतच्या तक्रारी विद्यार्थीच आपल्या पालकांकडे करू लागल्याने याबाबतची खरी परिस्थिती ही समोर येऊ लागली आहे.
विद्यार्थ्यांना शिकविताना जर शिक्षकाला त्यांच्या शाळाबाहेरील कामासंदर्भातील काही निरोप मोबाईलवर आला, तर त्या शिक्षकाचे पूर्णपणे अध्यापनाकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत जर शिक्षक मुलांना शिकविण्याऐवजी जर मोबाईलवरील विविध साईटस् वर आपला वेळ घालवत असेल किंवा मोबाईलवरून आपली बाहेरील कामे सांभाळत असेल तर देशाची भावी पिढी कशी घडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मोबाईलबहाद्दर शिक्षकांना रंगेहाथ पकडून कारवाई करण्यासाठी फ्लाईंग स्कॉड नेमण्याचा निर्णय घेतला होता; मात्र काही वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रभावात सर्व शैक्षणिक प्रक्रिया ही ऑनलाईन झाली होती. त्यामुळे मोबाईल-शिक्षक आणि विद्यार्थी हे समीकरण निर्माण झाले होते; मात्र कोरोना जाऊन आज तीन ते चार वर्षे झाले असतानासुद्धा शाळेमध्ये ऑनलाइन व मोबाईलच्या वापराला कुठलेही निर्बंध लादण्यात आलेले दिसत नाही. त्यामुळेच की काय अनेक शाळांमध्ये शिक्षक हे आपल्या कामकाजावेळी मोबाईलचा वापर करीत असल्याच्या बाबी समोर येत आहेत. तेव्हा शिक्षण विभागाने याची दखल घेत या प्रकाराला निर्बंध घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना राबविणे तेवढेच गरजेचे झाले आहे.
"जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षक यांचे मोबाईल शालेय कालावधीत संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांच्याकडे जमा करण्याबाबत यापूर्वीच निर्देश देण्यात आलेले आहेत."- स्नेहल काटकर, गटशिक्षणाधिकारी, वणी