सहकारातही मोदींच्या नावाचा वापर

By Admin | Updated: June 25, 2016 02:32 IST2016-06-25T02:32:03+5:302016-06-25T02:32:03+5:30

सहकारातील निवडणुकीत अपवादानेच घडलेला प्रकार राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिसत आहे.

Use of Modi's name in cooperation | सहकारातही मोदींच्या नावाचा वापर

सहकारातही मोदींच्या नावाचा वापर

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रचार युद्ध : काँग्रेसचेही व्हीआयपी नेते फलकावर
के.एस. वर्मा राळेगाव
सहकारातील निवडणुकीत अपवादानेच घडलेला प्रकार राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांचे चेहरे प्रचार फलकावर झळकू लागले आहे. एकूणच या निवडणुकीने पक्षीय स्वरूप घेतले आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसमध्येच दोन गट आमनेसामने आले. दोघेही आम्हीच खरे काँग्रेसचे असा दावा करत आहे.
आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील पॅनलने प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ना. हंसराज अहीर, भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याध्यक्ष रावसाहेब दानवे, ना. सुधीर मुनगंटीवार, ना.डॉ. रणजित पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदींच्या प्रतिमांचा वापर फ्लेक्स आणि प्रचार पत्रकात करण्यात आला आहे. त्यातच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शेतीविषयक कामांवर मतदारांना आवाहन करत अजूनही मोदी लाटेत ही निवडणूक जिंकण्याची आशा बाळगली आहे.
माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या नेतृत्त्वातील पॅनेल व बाजार समितीत सत्तारूढ अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांच्या नेतृत्त्वातील दोन्ही पॅनेलने सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण, वामनराव कासावार यांच्या प्रतिमांचा वापर प्रचार पत्रकात करून काँग्रेस पक्ष समर्थित पॅनल असा केला आहे. साधारणत: व्हीआयपी नेत्यांच्या प्रतिमांचा आणि आवाहनांचा उपयोग विधानसभा निवडणुकीत केला जातो. आता स्थानिक बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने सहकारातही हे चेहरे फलक आणि पत्रकावर दिसायला लागले आहे.
या संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार विधानसभेच्या प्रचाराच्या तोडीचा व प्रतिष्ठेचा राहिला. महागड्या वाहनांमधून महिनाभर खेड्यापाड्यात प्रचाराचा धुरळा उडविला. तीनही गटाने सोशल मीडियावरूनही प्रचार मोहीम राबविली.

शासकीय मालमत्तेवर पॅनेलचा ताबा
राळेगाव बाजार समिती निवडणुकीतील तीनही पॅनेलने सहकारी संस्था आणि शासनाच्या मालमत्तेवर ताबा मिळविला आहे. त्यांचे प्रचार कार्य याच ठिकाणाहून सुरू आहे. आमदार गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व्हीआयपी सूटमध्ये बस्तान मांडले आहे. मानकर गटाने मध्यवर्ती बँकेच्या व्हीआयपी वातानुकुलीत विश्रामगृहाचा वापर सुरू केला आहे. पुरके गटाने वसंत सहकारी जिनिंगचे सभागृह प्रचार मोहिमेसाठी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Use of Modi's name in cooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.