बेंबळा कालव्याची वापरापूर्वीच डागडुजी
By Admin | Updated: December 13, 2014 02:31 IST2014-12-13T02:31:00+5:302014-12-13T02:31:00+5:30
बेंबळा प्रकल्पाच्या कालव्यांना वापरापूर्वीच तडे जात आहे. तालुक्यात झालेल्या कामांची आतापासूनच डागडुजी केली जात आहे.

बेंबळा कालव्याची वापरापूर्वीच डागडुजी
कळंब : बेंबळा प्रकल्पाच्या कालव्यांना वापरापूर्वीच तडे जात आहे. तालुक्यात झालेल्या कामांची आतापासूनच डागडुजी केली जात आहे. यात पाण्याचे गेट, लाईनिंग, पूल, कालवा, उपकालवा आदी बांधकामाचा समावेश आहे़ यावरून बांधकामाच्या दर्जाची कल्पना येते़ प्रकल्पाचे पाणी मिळण्याच्या आशेवर शेतकऱ्यांनी काळजाचा तुकडा प्रकल्पासाठी दिला़ परंतु झालेल्या कामांमुळे शेतापर्यंत पाणी पोहोचण्याविषयी साशंकता आहे. त्यामुळे शेतातील कालवे बुजवून जमिनी परत करा, अशी टोकाची भूमिका अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहे. मोठ्या कालव्याचे बांधकाम व्यवस्थित झाल्याचे दिसून येते़ परंतु वितरिका, लघुपाट, पाटसरी आणि शेतचारी या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक चुका आहे़ त्यामुळे सोडलेले पाणी सरळ नदी-नाल्यावाटे वाहून जाते़ कुठलाही कालवा यशस्वी होण्यासाठी त्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत प्रवाही पध्दतीने गेले पाहिजे़ परंतु बेंबळा प्रकल्पाची स्थिती यापेक्षा वेगळी आहे़
चाचणीच्या नावाखाली सोडलेले पाणी नदी-नाल्यावाटे वाहून जाते़ याकडे मात्र सर्वांनी सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे़ नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत हा विषय तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
उपकालवा दहेगाव ते परसोडी या गावावरुनही गेला़ या परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही पाणी मिळाले नाही़ दहेगाव ते परसोडी दरम्यानचा कालवा चुकीचा टाकण्यात आला आहे़ सर्वेनुसार काम झाले नाही़ त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जास्त जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना कमी तर, कमी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊन दुजाभाव करण्यात आला आल्याचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)