अत्यावश्यक दूरध्वनी बंद
By Admin | Updated: April 5, 2015 00:04 IST2015-04-05T00:04:14+5:302015-04-05T00:04:14+5:30
येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले.

अत्यावश्यक दूरध्वनी बंद
नागरिकांची तारांबळ : रूग्णालय, ठाण्याशी संपर्क साधणे कठीण
वणी : येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले. त्यामुळे रूग्ण, त्यांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांना या दोनही ठिकाणी संपर्क साधणे कठीण झाले.
वणीत ग्रामीण रूग्णालय आहे. या रूग्णालयावरच तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्व भार आहे. या तालुक्यात वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे दररोज किरकोळ आणि मोठे अपघात घडत असतात. त्यात अनेक जखमी होतात. त्यांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. अन्यथा अपघातात काहींचा जीव जाण्याचा धोका असतो. मात्र येथील ग्रामीण रूग्णालयातील दूरध्वनीच ठप्प पडल्याने या रूग्णालयाशी संपर्क साधणे अपघातातील जखमी अथवा त्यांच्या नातेवार्इंना कठीण झाले आहे.
हीच गत पोलीस ठाण्याची आहे. येथील पोलीस ठाण्यातील दूरध्वनीही गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यावर दूरध्वनी केल्यास रिंग जाते. मात्र पलिकडे कुणीही दूरध्वनीच उचलत नाही. त्यामुळे गंभीर अपघात, चोरी, अथवा एखाद्या गंभीर घटनेबाबत पोलिसांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. पोलीस ठाण्याच्या २२५0७८ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी जनतेने काय करावे, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
ग्रामीण रूग्णालयातील २२५४५४ क्रमांकाचा दूरध्वनीही गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडला आहे. त्यावर रिंग केल्यास लगेच संपर्क तुटून जातो. त्यामुळे या रूग्णालयाशी तातडीने संपर्क कसा साधावा, असा प्रश्न रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांना पडला आहे. रूग्णालय आणि पोलीस ठाणे हे दोनही अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे. मात्र तेथीलच दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. सामान्य नागरिकांकडे या दोनही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांचे भ्रमणध्वनी क्रमांक नाहीत. त्यांनी नेमका कुठे संपर्क साधावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अपघाताची माहिती देण्यास विलंब
शनिवारी परिसरात जवळपास तीन अपघात झाले. या अपघाताची माहिती देतानाही काहींची तारांबळ उडाली. त्यांनी पोलीस ठाणे आणि ग्रामीण रूग्णलयाचा क्रमांक डायल केला. मात्र त्यांना पलिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यास वेळ लागला. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. अपघाताची माहिती देण्यासही विलंब झाला. या अपघातात प्राणहानी झाली असती, किंवा मोठा अपघात असता, तर बिकट प्रसंग निर्माण झाला असता.