युरियाचा काळाबाजार
By Admin | Updated: November 20, 2014 22:59 IST2014-11-20T22:59:58+5:302014-11-20T22:59:58+5:30
खरिपाचा हंगाम आता संपला असून रबीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे रबीला लागणाऱ्या युरिया खताची मागणी वाढली आहे. अशातच बाजारातून युरिया गायब झाला असून महागाव तालुक्यात

युरियाचा काळाबाजार
कृत्रिम टंचाई : विक्रे त्यांकडून होतेय शेतकऱ्यांची अडवणूक
महागाव : खरिपाचा हंगाम आता संपला असून रबीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे रबीला लागणाऱ्या युरिया खताची मागणी वाढली आहे. अशातच बाजारातून युरिया गायब झाला असून महागाव तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. मागणी वाढल्याने चढ्या भावात कृषी केंद्रांमधून युरियाची विक्री सुरू आहे.
कृषी केंद्रांमधून युरियाच मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असून भावात मोठी तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे. सहकारी तत्त्वावर शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य आणि बि बियाणे, खत, औषधी उपलब्ध करून देणारी खरेदी विक्री सहकारी संस्था भांडवलताच कमी पडत आहे. याचाच फायदा खासगीतील कृषी केंद्र चालक घेत आहे. तालुका कृषी विभाग आणि पंचायत समिती कृषी विभागाचे नियंत्रण कृषी केंद्रावर नसल्याने अपवाद वगळता अनेक कृषी केंद्रांवर भाव फलक, स्टॉक बोर्ड हद्दपार झालेले दिसत आहे. त्यामुळे कोणत्या कृषी केंद्रात कोणती औषधी, खते उपलब्ध आहेत, त्यांचे भाव काय आहे याचा थांगपत्ता परिसरातील शेतकऱ्यांना लागत नाही. त्यामुळे मनमानीपणे शेती उपयोगी साहित्य, खते व औषधी विकण्यात येत आहे.
तालुक्यात जवळपास १०० कृषी केंद्र असून काळी दौ., फुलसावंगी, गुंज, महागाव आणि मुडाणा परिसरातील कृषी केंद्र युरियाचा काळाबाजार करण्यात अग्रेसर असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. युरिया खताचा काळाबाजार करण्यात येत असून तालुक्यातील कृषी केंद्रातून मिळणाऱ्या युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. अनेक कृषी केंद्र संचालकांचे अनधिकृत गोदाम असून अशा गोदामात युरिया आणि इतर औषधांसह खते भरून ठेवण्यात आली आहे. अशा अनधिकृत गोदामांचा शोध घेऊन तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. (शहर प्रतिनिधी)