निराधार योजनेचे अध्यक्षपद नाकारले
By Admin | Updated: August 20, 2014 23:46 IST2014-08-20T23:46:52+5:302014-08-20T23:46:52+5:30
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या

निराधार योजनेचे अध्यक्षपद नाकारले
मुकेश इंगोले - दारव्हा
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या शिफारसीवरून त्यांची नियुक्ती झाली. मात्र उशिरा नियुक्ती मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी पद नाकारले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
निराधारांना आधार देणाऱ्या निराधार योजनेचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. काँग्रेसमधील अंतर्गत भानगडीमुळे सदर पद इतके दिवस रिक्त होते. कुणाचीही नियुक्ती केली जात नव्हती. आता आघाडी सरकारचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जगन पाटील कदम यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले. परंतु त्यांनी थोड्या दिवसासाठी उपकार नको म्हणत पद नाकारल्याची माहिती आहे.
निराधार योजनेचे यापूर्वी बबनराव ठाकरे अध्यक्ष होते. परंतु त्यांचे निधन झाले. त्यामुळे पद रिक्त होते. या पदावर नियुक्ती करण्याची मागणी जगन कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली. परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना विरोध केल्याने ही नियुक्ती रखडली होती. आपल्याच तालुक्यातील पक्षांतर्गत वाद सोडविण्यात खुद्द प्रदेशाध्यक्षांना अपयश आल्याने महत्त्वाच्या समितीला तब्बल दीड ते दोन वर्ष अध्यक्षच मिळू शकला नाही.
जगन कदम हे काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहे. या परिसरात त्यांची सज्जन राजकारणी म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण हयात प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे कार्यकर्ते म्हणून घालविले आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते.
त्यातूनच त्यांनी अध्यक्षपदाची मागणी केली. या पदाच्या माध्यमातून निराधारांचा प्रश्न सोडविण्याचा त्यांचा मानस होता. तालुक्यातील अनेक गरीब, वृद्ध, विधवा यांना कोणताही आधार नाही. या योजनेतून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कदम प्रयत्न करणार होते. परंतु काँग्रेसमधील अंतर्गत भानगडीमुळे पद रिक्त राहिले. वरिष्ठांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. शेवटी आघाडी सरकारचा कालावधी संतप आला असताना अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र आले. परंतु जगन कदम यांनी सदर पद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. आता निवडणुकीच्या तोंडावर पद घेवून काम काय करू, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
आपल्या तालुक्यातील व्यक्ती काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष व त्याच पक्षाचे राज्यात सरकार आहे. परंतु सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नसेल तर करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यात काँग्रेस गोटात एकच खळबळ उडाली आहे.