मानधनवाढीसाठी आशांचे ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासनाने वारंवार आश्वासन देऊनही मानधनवाढ न मिळाल्याने जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी मंगळवारपासून कामबंद ...

मानधनवाढीसाठी आशांचे ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाने वारंवार आश्वासन देऊनही मानधनवाढ न मिळाल्याने जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण भागात राबणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे, तसेच मानधनवाढ लागू करण्यात यावी, या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात मंगळवारपासून राज्यभरातच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना वेठबिगारासारखे राबवून घेतले जात आहे. काही राज्यांमध्ये दहा हजार रुपये मानधन असताना महाराष्ट्रात केवळ २५०० रुपये दिले जात आहे. मंत्र्यांनी बैठका घेतल्यानंतरही मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आशासेविका संतप्त झाल्या आहेत. केवळ आश्वासनावर बोळवण करणाºया शासनाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने मानधनवाढीचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष दिवाकर नागपुरे यांनी दिली.
मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने शंभरावर आशासेविका मंगळवारी रात्रीही आंदोलनस्थळीतच होत्या.