विनापरवाना स्कूल बस रस्त्यावर
By Admin | Updated: March 13, 2015 02:31 IST2015-03-13T02:31:45+5:302015-03-13T02:31:45+5:30
तालुक्यासह गावागावात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली.

विनापरवाना स्कूल बस रस्त्यावर
उमरखेड : तालुक्यासह गावागावात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली. मात्र बहुतांश स्कूल बस विना परवाना रस्त्यावर धावत असून यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. पालकांचेही दुर्लक्ष होत असून परिवहन विभागही कारवाई करताना दिसत नाही.
उमरखेड शहरासह ढाणकी, मुळावा, बिटरगाव, दराटी, ब्राम्हणगाव, विडूळ, पोफाळी यासह अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी या शाळांनी स्कूल बस सेवा सुरू केली आहे. घरापासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना नि:शुल्क नेले जात असल्याने अनेक पालक या शाळांकडे आकर्षित झाले आहे. मात्र या स्कूल बसमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा दिसत नाही. पालकही खातरजमा करीत नाही. केवळ नि:शुल्क सेवा मिळते ना असे म्हणत गप्प असतात. अवैध प्रवासी वाहन आणि स्कूल बसमध्ये तसा फारसा फरक नसतो.
उमरखेड परिसरातील शेकडो विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळात स्कूल बसने जातात. ६ ते १० आसने छोट्या वाहनावर स्कूल बस लिहून विद्यार्थ्यांना प्रवास घडविला जातो. अनेकदा वाहनांवर अप्रशिक्षित चालक दिसून येतात. कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही.
क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी अक्षरश: कोंबले जातात. काही वर्षापूर्वी अमरावती येथे स्कूल बसला अपघात झाला होता. त्यात चिमुकल्यांचा जीव गेला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या परिवहन विभागाने कठोर नियम केले. सुरुवातीला या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. परंतु आता सर्व नियम धाब्यावर बसवून खुलेआम विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते.
राज्य शासनाच्या नियमानुसार परिवहन विभागाकडून स्कूल बसला बॅच क्रमांक दिला जातो. परंतु उमरखेड शहरातील अनेक स्कूल बस चालकांकडे बॅच क्रमांक आणि परवाना आढळून येत नाही. स्कूल बसवर अनेकदा शाळेचे नावही लिहिलेले नसते. बिचाऱ्या चिमुकल्यांना बसवायचे आणि शाळेत आणायचे असा काहीसा प्रकार सुरु आहे. पोलीस, परिवहन विभागाला याचे कोणतेही सोयरसूतक नाही. (शहर प्रतिनिधी)