उमरखेड तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण
By Admin | Updated: March 19, 2015 02:13 IST2015-03-19T02:13:06+5:302015-03-19T02:13:06+5:30
तालुक्यात सध्या अवैध धंद्यांना उधाण आले असून पोलीस व सबंधित विभागांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

उमरखेड तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण
उमरखेड : तालुक्यात सध्या अवैध धंद्यांना उधाण आले असून पोलीस व सबंधित विभागांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. यामुळे सर्वसामन्य नागरिक त्रस्त असून प्रशासनाबाबत रोष व्यक्त होत आहे.
तालुक्यात सध्या अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला आहे. काळ्या पिवळींसह इतरही वाहने प्रवासी कोंबून चालविली जात आहे. यामध्ये प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून प्रसंगी उभे ठेवून ही वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताची शक्यतासुद्धा असते. एसटी बसच्या अनियमित व कमी वेळा तसेच वाढते तिकीट दर यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागतो. परंतु या बाबीकडे पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
या शिवाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. जुगार, मटका यासोबतच गावागावात अवैध हातभट्टीची दारु विक्री केली जाते. यामुळे ग्रामीण जनता त्रस्त आहे. हे सर्व धंदे बंद करण्याबाबत पोलीस प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींचीही उदासीनता दिसून येते. सबंधित लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. (शहर प्रतिनिधी)