केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी स्थितीचा आढावा
By Admin | Updated: April 20, 2015 00:05 IST2015-04-20T00:05:15+5:302015-04-20T00:05:15+5:30
जिल्ह्यात वातावरणातील अनियमीततेमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी स्थितीचा आढावा
अधिकाऱ्यांना निर्देश : सिंचन सुविधेसह कृषी पंप वीज जोडणीचा अनुशेष दूर करण्याचा आदेश
यवतमाळ : जिल्ह्यात वातावरणातील अनियमीततेमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. खरीप, रबी या दोन्ही हंगामातील प्रमुख पिके उद्ध्वस्त झाली. याच स्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री
हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.
या बैठकीला जिल्ह्यातील आमदार मदन येरावार, संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. राजु तोडसाम, राजु नजरधने, डॉ. अशोक उईके आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सिंचन सुविधेत अधिकाधिक वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश अहीर यांनी दिले. वीज जोडण्या, विद्युत पुरवठा, सिंचन प्रकल्पाची दुरूस्ती ही कामे समाधानकारक नसल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रधानमंत्री ग्रामीण सिंचन योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या.
जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणीही १०० टक्के लक्ष उराशी बाळगूनच केली जावी असे सांगितले. जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, वीज आणि सिंचनासारख्या सुविधा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी समपर्क पर्याय आहे. सरकारच्या सिंचनविषयक योजनांमध्ये कार्यरत एजन्सीज व ठेकेदारांकडून निश्चित कालावधीत पूर्ण करून घेण्यात यावी ही कामे उपयुक्त ठरतील व योग्य ठिकाणीत व्हावी याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, तालुकास्तरावर विकासकामांचा निधी वितरित करताना समतोल पाळण्यात आला नाही अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समान निधी उपलब्ध करून देण्याची
दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी असे हंसराज अहीर यांनी
सांगितले.
सर्व विकासकामांच्या देखरेखीसाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करावी असेही सांगण्यात आले. बैठकीत उपस्थित आमदारांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. अकाली पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. या नुकसानीचा वस्तूनिष्ठ सर्वे करण्यात यावा, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा निधी तातडीने देण्यात यावा अशा सूचना अहीर यांनी दिल्या.
(कार्यालय प्रतिनिधी)