नादुरूस्त उभी वाहने धोकादायक
By Admin | Updated: October 8, 2015 02:19 IST2015-10-08T02:19:04+5:302015-10-08T02:19:04+5:30
शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत.

नादुरूस्त उभी वाहने धोकादायक
अपघाताला निमंत्रण : वाहतूक पोलीस, आरटीओंचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
वणी : शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत. ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असून याकडे वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष देऊन वाहने हटविण्याची मागणी होत आहे.
साई मंदिर चौकाजवळ असलेल्या एका गॅरेजजवळ गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोन नादुरूस्त वाहने उभी आहे. या वाहनांचा वापर होत नसल्यामुळे ते जागेवरच जीर्ण होत आहे. या वाहनांचे नेमके मालक कोण, हेसुद्धा नागरिकांना माहिती नाही. मात्र ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असल्याने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
याच मार्गावर रेल्वे क्रॉसिंगकडे जाताना एका ड्रायव्हींग स्कूलचे नादुरूस्त वाहनही रस्त्याच्या कडेला उभे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी ही वाहने दृष्टीसही पडत नाही. रस्त्याच्या अगदी लगतच ही नादुरूस्त वाहने उभी असल्याने कधी मोठा अनर्थ घडेल, याचा भरवसा उरला नाही. नागरिकांना ही नादुरूस्त वाहने दररोज दिसतात. मात्र वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे या वाहनांकडे कसे लक्ष जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ही वाहने अगदी रस्त्याच्या कडेलाच उभी असल्याने अर्धा रस्ताच त्यांनी व्यापून टाकला आहे. परिणामी उर्वरित रस्त्यावरून वाहन चालकांना आपले वाहन समोर काढावे लागते. एखाद्यावेळी समोरून मोठे चारचाकी वाहन समोरासमोर आले की, तेथून मार्ग काढणे कठीण जाते. त्याचबरोबर या उभ्या नादुरुस्ती वाहनांवर दुसरे वाहने आदळू शकतात. या वाहनांवर मात्र आता चोरट्यांची नरज गेली आहे. एका वाहनाचे मागील बाजूचे टायरच गायब झाले आहे. काही सुटे भागसुद्धा चोरीला गेले आहे. या वाहनांचे मालक कोण आहेत, याचासुद्धा कुणाला थांगपत्ता नाही. मात्र ही वाहने जेथे उभी आहेत, त्या परिसरातील नागरिकांना अडचणीची ठरत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)