Ganesh Chaturthi 2018; यवतमाळ जिल्ह्यात विडूळ येथे एकाच छताखाली गणपती आणि मोहरम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 11:32 IST2018-09-17T21:27:43+5:302018-09-18T11:32:30+5:30
सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

Ganesh Chaturthi 2018; यवतमाळ जिल्ह्यात विडूळ येथे एकाच छताखाली गणपती आणि मोहरम
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : सध्या संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. येथील नालसाहेब देवस्थानात एकाच वेळेस गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यात येत आहे.
नालसाहेब देवस्थानचे अध्यक्ष जयराम डांगे यांची चौथी पिढी मोहरम हा उत्सव परंपरेने साजरा करतात. त्यांच्या घराण्यामध्ये १३४ वषार्पासून ही परंपरा सुरु आहे. स्वत:च्या मालकीचे असलेले हे देवस्थान आता सार्वजनिक झाले आहे.२१ जानेवारी २०१५ रोजी या संस्थेची रितसर नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावर्षी गणेशोत्सव व मोहरम हे एकाच वेळेस साजरे करण्यात येत आहे. ही बाब हेरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सुचनेनुसार उमरखेडचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी ८ सप्टेंबर ला विडूळ येथील ग्रामपंचायतीमध्ये शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस प्रशासनाच्यावतीने विडूळ येथील नालसाहेब देवस्थानात एकाच वेळी एकाच ठिकाणी गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्याची अभिनव संकल्पना मांडली. लगेच सर्व सदस्यांनी यास होकार दिला. या बैठकीत सर्व धर्माचे बांधव सहभागी झाले होते. एकमुखाने निर्णय झाल्यानंतर १३ सप्टेंबरला गणेशाची स्थापना केली, तर त्याच्याच बाजूला सव्वातीन फुटाची मोहरमची सवारी आहे. २० सप्टेंबरला मोहरम आणि गणेशोत्सवाची सांगता केल्यानंतर २२ सप्टेंबरला देवस्थानच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.