राज्यमार्गावर बेशिस्त वाहतूक

By Admin | Updated: March 15, 2015 00:26 IST2015-03-15T00:26:08+5:302015-03-15T00:26:08+5:30

शहराच्या विस्तारासोबत वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरातील वाहतुकीला कोणतीच शिस्त नसून वाटेल तेथे वाहने उभी केली जातात.

Unconditional traffic on the highway | राज्यमार्गावर बेशिस्त वाहतूक

राज्यमार्गावर बेशिस्त वाहतूक

उमरखेड : शहराच्या विस्तारासोबत वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरातील वाहतुकीला कोणतीच शिस्त नसून वाटेल तेथे वाहने उभी केली जातात. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असून अपघाताच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
झपाट्याने वाढणाऱ्या उमरखेड शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शालेय विद्यार्थ्यांजवळही वाहने आली आहे. परंतु त्या तुलनेत सुरक्षित वाहन चालविण्याचे आणि नियमांचे पालन करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. सध्या उमरखेड शहरातील वाहतूक अतिशय जोखमीची ठरते. नागपूर-बोरी-तुळजापूर हा मुख्य मार्ग शहरातून जातो. हा एकच मार्ग असल्याने या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. त्यात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि दोनही बाजूला दुकाने असल्याने ग्राहकांच्या वाहनांची पार्किंग असते. यामुळे एकच गोंधळ उडतो. अनेकदा वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रसंग उद्भवतो.
शहरातील संजय गांधी चौक, महागाव चौक, नांदेड रोड, ढाणकी रोड, पुसद रोड याठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ठिय्या असतो. अतिशय बेशिस्त वाहने रस्त्यावर उभी असतात. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. गायत्री चौकात अवैध प्रवासी वाहतूक रहदारीला अडथळा ठरत आहे. मात्र पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वसुलीच्या माध्यमातून अवैध वाहतूक करणाऱ्यांना खुली सूट दिल्याचे बोलले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे महिला व विद्यार्थ्यांना या अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका सहन करावा लागतो. पोलिसांना विचारणा केले तर हे आमचे काम नाही असे सांगून ते मोकळे होतात. शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली असली तरी त्याठिकाणी न दिसता शहराबाहेर ट्रकचालकांकडून वसुली करताना दिसून येतात. या सर्व बाबींमुळे उमरखेड शहरातील वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे.
उमरखेड शहर भाजपाचे अध्यक्ष नितीन भुतडा यांनी याबाबत रोष व्यक्त करून वाहतूक पोलिसांबाबत प्रश्न उपस्थित केला. शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गासाठी बायपास द्यावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली परंतु उपयोग झाल नाही. राज्य मार्गालगत अतिक्रमण वाढले असून तेही काढले जात नाही. (शहर प्रतिनिधी)
पुसद, महागाव, ढाणकी आणि नांदेड या मार्गावरील वाढते अतिक्रमण काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. मात्र शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या आणि इतर व्यावसायिकांवर लवकरच कारवाई केली जाईल. तसेच महसूल, बांधकाम, पोलीस आणि नगरपरिषद संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार आहे.
- प्रवीण मानकर,
मुख्याधिकारी, नगरपरिषद
शहरात अवैध वाहतूक करणाऱ्या व रस्त्यामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्व मुख्य चौकात पोलीस शिपाई नियुक्त करण्यात आले आहे. लवकरच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींबाबत कारवाई केली जाईल.
- शिवाजी बचाटे,
ठाणेदार, उमरखेड

Web Title: Unconditional traffic on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.