शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाने भाजपात अस्वस्थता
By Admin | Updated: February 1, 2016 02:17 IST2016-02-01T02:17:08+5:302016-02-01T02:17:08+5:30
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर शिस्तीत पथसंचलन केले.

शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाने भाजपात अस्वस्थता
आता भाजपाचीही मोर्चेबांधणी : पक्षाच्या पालकमंत्र्यांसाठी संघटनमंत्र्यांना साकडे
राजेश निस्ताने यवतमाळ
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर शिस्तीत पथसंचलन केले. जिल्हाभरातील शिवसैनिकांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या शक्ती प्रदर्शनाने भारतीय जनता पक्षाच्या गोटात मात्र प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. या शक्ती प्रदर्शनावर शनिवारी टिळक भवनात भाजपाच्या संघटनमंत्र्यांसमक्ष छोटेखानी चिंतनही झाले.
जिल्ह्यात भाजपाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे संघटन सरचिटणीस रवींद्र भुसारी, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी टिळक भवनात आढावा घेतला. या बैठकीला आमदार मदन येरावार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपाचे नवीन १३ मंडल अध्यक्ष व अन्य मंडलातील प्रभारी अध्यक्ष उपस्थित होते. शिवसेनेच्या शक्ती प्रदर्शनावर यावेळी चर्चा झाली. शिवसेनेने संपूर्ण जिल्ह्यातून शिवसैनिक बोलावून आपली ताकद दाखविली. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला पोषक वातावरण तयार झाले आहे. भाजपाने गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात कुठेही असे शक्ती प्रदर्शन केले नसल्याचा मुद्दाही पुढे आला. त्यावर भाजपानेही यवतमाळात शक्ती प्रदर्शन करावे, अशी सूचना मांडली गेली. मात्र तसे केल्यास केवळ यवतमाळपुरते हे वातावरण निर्माण होईल. त्याऐवजी विधानसभा मतदारसंघनिहाय शक्ती प्रदर्शन केल्यास गावापर्यंत त्याचा प्रभाव पडेल, अशी सूचना मांडली गेली. त्यावर भाजपात विचार सुरू आहे.
विशेष असे, या बैठकीत जिल्ह्यातील भाजपा आमदारांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले गेले. शिवसेनेचे पालकमंत्री लाल दिव्याच्या प्रकाशात पक्षाचा रथ पुढे दामटत आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात तातडीने भाजपाचा पालकमंत्री द्यावा, शक्यतोवर तो जिल्ह्यातूनच द्यावा, अशी मागणी यावेळी पक्षाच्या संघटनमंत्र्यांपुढे रेटण्यात आली.
जिल्हाध्यक्ष पदावरही चर्चा, पक्षाच्या संथ बांधणीवर नाराजी
यवतमाळ जिल्ह्यात भाजपाची पक्षांतर्गत बांधणी संथगतीने सुरू असल्याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. २१ पैकी केवळ १३ मंडलांचे अध्यक्ष आतापर्यंत निश्चित झाले. ८० टक्के ग्राम समित्या व बूथ समित्या झाल्या नाहीत. त्यामुळेच नव्या जिल्हाध्यक्षांच्या घोषणेस विलंब होत आहे. जिल्ह्याला नवा चेहरा द्यावा, अशी मागणी यावेळी केली गेली. चर्चेत असलेल्या नावामधून द्या अथवा आणखी कोणी सक्षम नाव निवडा, मात्र नवा चेहरा द्या, असा जोर यावेळी दिला गेला. आमदारांमधून कुणाला जिल्हाध्यक्ष बनविले जावू नये, असे सुचविण्यात आले. शिवाय जिल्हाध्यक्षपदात आमदारांनाही फारसा इंटरेस्ट नसल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे आपल्या कार्यकाळात काँग्रेसकडील विधानसभेच्या पाच जागा भाजपाने खेचून आणल्या, असे सांगत विद्यमान जिल्हाध्यक्षांसाठी ‘लॉबिंग’ सुरू आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत जिल्हाध्यक्ष रिपिट होवू नये, प्रत्येकवेळी नवा चेहरा देण्याची परंपरा खंडित करू नये, अशी मागणी केली गेली. मंडल अध्यक्ष, ग्राम समित्या, बूथ समित्या पूर्ण करण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टीमेटम विद्यमान जिल्हाध्यक्षांना देण्यात आला आहे. ५ तारखेला पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पक्षाचे निरीक्षक माजी आमदार अतुल देशकर ८ फेब्रुवारी रोजी येथे पक्ष बांधणीसंबंधी बैठक घेतील. त्यानंतर नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.