भर शहरात अनधिकृत कचरा डेपो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:31 IST2019-07-06T21:30:02+5:302019-07-06T21:31:02+5:30
स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे.

भर शहरात अनधिकृत कचरा डेपो
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे.
नगरपरिषद आरोग्य विभाग प्रत्येक पावसाळ््यात अभ्यंकर कन्या शाळेसमोर असलेल्या खुल्या जागेत कचरा साठवत आहे. यामुळे त्रस्त नागरिक तक्रारी करतात. त्यानंतर पालिकेकडून थातूरमातूर व्यवस्था केली जाते. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. एकीकडे स्वच्छ शहरासाठी कचरा विलगीकरणाची संकल्पना राबविली जात असल्याचे सांगण्यात येते. स्वच्छता कंत्राटदारासोबत करार केल्यानंतर त्यामध्ये कचरा विलगीकरण आणि दैनंदिन कचºयाची रोज विल्हेवाट लावण्याचे नमूद केले आहे. त्यानंतरही करारातील अटींचे पालन होताना दिसत नाही. जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे. नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर तो उचलण्यात येईल असे सांगितले जाते. प्रत्यक्ष जितका कचरा तेथे टाकतात, त्याच्या पाच ते दहा टक्के कचरा उचलला जातो. या ढिगाºयामध्ये पावसाचे पाणी मुरल्याने उग्र दर्प येत आहे. दत्त चौकात जाणाºया मार्गावर अक्षरश: नाक बंद करूनच जावे लागते. माशा व डासांची उत्पत्ती नगरपरिषदेकडून केली जात आहे. यामुळेच शहरात डेंग्यू व हिवतापाचे रुग्ण आढळतात. कचरा विलगीकरण तर दूरच तांत्रिक निर्देशाचेही पालन केले जात नाही. तीन प्रभागातील कचरा एकाच ठिकाणी दररोज साठविला जात आहे. आरोग्य विभागाने याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मागील पाच वर्षापासून ही समस्या सतावत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यावर अद्यापपर्यंत कायमस्वरूपी तोडगा काढला नाही. उलट महिन्याकाठी स्वच्छतेची लाखो रूपयांची देयके काढली जात आहे. नगरपरिषदेच्या एकूूण खर्चापैकी मोठी रक्कम घनकचरा व्यवस्थापनावर खर्च होते. त्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. आरोग्य विभागाकडून साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नाही.
नगरसेवक आंदोलन करण्याच्या तयारीत
शहरातील विविध प्रभागातून गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी नगरपरिषदेकडे जागाच नाही. त्यामुळे रात्री अथवा पहाटे जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे. पावसाळ्यात घरात कचरा ठेवणेही शक्य होत नाही. त्यामुळे नगरसेवकांवर दबाव वाढत आहे. प्रशासनाला वारंवार निवदेन देऊनही तोडगा काढला जात नाही. यामुळे नगरसेवक उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.