अप्रमाणित पुतळ्याचे अनावरण करू नये
By Admin | Updated: December 23, 2016 02:24 IST2016-12-23T02:24:43+5:302016-12-23T02:24:43+5:30
शहरात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा लागावा त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती

अप्रमाणित पुतळ्याचे अनावरण करू नये
पत्रपरिषद : शिवाजी महाराज पुतळा समिती
यवतमाळ : शहरात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा लागावा त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती मागील २० वर्षांपासून शासन स्तरावर प्रयत्न करीत होती. याला २०११ मध्ये अंशत: मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर नगरपरिषदेने घाईगडबडीत अश्वारुढ पुतळा बसविला. या अप्रमाणित पुतळ्याचे लोकार्पण करू नये, अशी मागणी पुतळा समितीने गुरुवारी येथे पत्रपरिषदेत केली.
यवतमाळातील नाट्यगृह परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. त्याकरिता ११ मार्च २०११ रोजी नगरपरिषदेच्या सभेत ठराव घेण्यात आला. यात नगरपालिकेने जागा देण्याचे मान्य केले. तसेच पुतळा बसविण्यासाठी शासन स्तरावरच्या विविध परवानगी पुतळा समितीने घ्यावी असे ठरले. या ठरावात पुतळ्याच्या चबुतऱ्याचे मोजमाप, आराखडा, पुतळ्याचा साईड प्लॉन, धातू, वजन, उंची, रंग याचा तपशील घेऊन पुतळ्याच्या रेखाचित्रासह मुख्य वास्तू शास्त्रज्ञाकडे सादर करून मान्यता घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात क्लेमॉडेलला कलामंचाने मान्यता दिली. त्या मान्यतेवरच पुतळा बसविण्यात आला आहे. मुळात हा पुतळा प्रमाणित नसल्याने त्याचे अनावरण करण्यात येऊ नये, पालिकेच्या आडमुठ्या धोरणाविरोधात दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पुतळा स्मारक समिती अध्यक्ष डॉ. नारायण तावडे यांनी सांगितले. यावेळी विलास तायडे व पुतळा स्मारक समिती सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)