उमरखेड वन विभागाच्या इमारती मोडकळीस

By Admin | Updated: June 13, 2017 01:22 IST2017-06-13T01:22:25+5:302017-06-13T01:22:25+5:30

शहराच्या मध्य वस्तीत असलेले वन विभागाचे कार्यालय मोडकळीस आले असून सुरक्षा भिंतही उद्ध्वस्त झाली आहे.

Ummkhed Forest Department's buildings are downstairs | उमरखेड वन विभागाच्या इमारती मोडकळीस

उमरखेड वन विभागाच्या इमारती मोडकळीस

सुरक्षा भिंत उद्ध्वस्त : कर्मचारी निवासस्थाने ओस, मोकाट जनावरांचा सुळसुळाट, दुरुस्तीचे नाव नाही
दत्तात्रय देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहराच्या मध्य वस्तीत असलेले वन विभागाचे कार्यालय मोडकळीस आले असून सुरक्षा भिंतही उद्ध्वस्त झाली आहे. कर्मचारी निवासस्थाने ओस पडली असून या कार्यालय परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. अशा दयनीय अवस्थेत कार्यालय सुरू असताना दुरुस्तीसाठी मात्र उपाययोजना केल्या जात नाही.
शहराच्या मध्यवस्तीत आणि नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत उपविभागीय वन अधिकारी आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे. लगतच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहे. गेल्या कित्येक वर्षापासून वन विभागाचा कारभार येथून चालविला जातो. परंतु अलिकडच्या काळात कार्यालयाची दयनीय अवस्था झाली आहे. या दोन्ही कार्यालयाला असलेली संरक्षक भिंत पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. एवढेच नाही तर पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी थेट वन कार्यालय परिसरात घुसते. कार्यालयाच्या इमारतीचीही पडझड झाली असून निवासस्थाने दयनीय अवस्थेत आहेत. सात ते आठ कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली आहे. परंतु कधीच डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी अनेक कर्मचारी शहरात राहणे पसंत करतात. सुरक्षा भिंत, निवासस्थाने दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यातच आला नाही. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे, येथील दयनीय अवस्था पाहून वन्यजीव विभागाचे कार्यालय जेवली येथे हलविण्यात आले आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेले कार्यालय आज अतिशय दयनीय अवस्थेत पडून आहे. या इमारतींची डागडुजी करावी, अशी मागणी वन विभागातील कर्मचाऱ्यांसह नागरिक करीत आहे.

वाहने भंगारात
उमरखेड वन विभागाला शासनाने वाहने दिली होती. परंतु गेल्या चार वर्षापासून ही वाहने भंगारात पडली आहेत. शासकीय कार्यालयाच्या आवारात ही वाहने उभी असून ती गंजली आहे. या वाहनांच्या जुजबी दुरुस्तीकडे त्यावेळी दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांची वाहने आज त्या ठिकाणी उभी आहेत.

Web Title: Ummkhed Forest Department's buildings are downstairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.