उमरखेडचा रबी हंगाम भारनियमनात अडकणार
By Admin | Updated: November 4, 2016 02:09 IST2016-11-04T02:09:40+5:302016-11-04T02:09:40+5:30
परतीच्या पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची आशा रबी हंगामावर आहे.

उमरखेडचा रबी हंगाम भारनियमनात अडकणार
सिंचनात अडथळा : मुबलक पाणी, मात्र वीज अनियमित
उमरखेड : परतीच्या पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची आशा रबी हंगामावर आहे. मुबलक पावसामुळे नदीनाले आणि विहिरींमध्ये तुडूंब पाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु भारनियमनाचा कोलदांडा कायम असल्याने रबी हंगामही साधण्याची शक्यता नाही. सध्या हरभऱ्याची पेरणी केली जात असताना भारनियमनामुळे ओलीत करणे उमरखेड तालुक्यात अशक्य झाले आहे.
गत काही वर्षांपासून उमरखेड तालुक्यातील शेतकरी सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षी सुरुवातीला मुबलक पावसाने पीक परिस्थिती उत्तम होती. परंतु त्यानंतर पडलेला खंड आणि परतीच्या पावसाने सोयाबीन पुरते उद्ध्वस्त झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले होते. त्यानंतरही हाती आलेला सोयाबीन बाजारात कमी दरात विकावा लागला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. अशीच अवस्था कपाशीची आहे. कपाशीवर सध्या लाल्याने आक्रमण केले आहे. त्यामुळे कपाशीचे पीकही हातचे जाण्याची स्थिती आहे. सोयाबीन काढणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा पेरण्याचे नियोजन केले आहे. शेत पेरणीसाठी सज्ज केले परंतु भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. सहा ते सात तासांचे भारनियमन होत असून रात्री-अपरात्री वीज पुरवठा होतो. तसेच कमी दाबाचा वीज पुरवठाही कायम असतो. याचा फटका रबीला बसत आहे.
उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील जेवली परिसरातील शेतकरी तर भारनियमनाने त्रस्त झाले आहे. पैनगंगेसह इतर जलस्रोतांवर मोटारपंप लावून शेतकऱ्यांनी रबीची तयारी केली. डोळ्याने मुबलक पाणी दिसत असतानाही ओलित करणे मात्र अशक्य होत आहे. वीज वितरण कंपनीने कृषी पंपांना योग्य वेळात योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्यापही बंदी भागात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. (शहर प्रतिनिधी)