उमरखेड तालुक्यात कडब्याचे भाव भिडले गगनाला
By Admin | Updated: July 10, 2014 23:55 IST2014-07-10T23:55:05+5:302014-07-10T23:55:05+5:30
हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्यामुळे परिसरात अवर्षणप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच यंदाही पावसाने शेतकऱ्यांशी क्रूर डाव खेळल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र

उमरखेड तालुक्यात कडब्याचे भाव भिडले गगनाला
उमरखेड : हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्यामुळे परिसरात अवर्षणप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच यंदाही पावसाने शेतकऱ्यांशी क्रूर डाव खेळल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र पूरते अवसान गळाले आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर वळणावर असून कडब्याच्या पेंडीचे भावही गगनाला भिडले आहेत.
पावसाने दडी मारल्यामुळे सिंचन तलाव, नदी-नाले संपूर्णत: कोरडे ठण्ण पडले आहेत. पेरणीची आशा गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पशुधन कसे वाचवावे, हा प्रश्न पडला आहे. ओला चाऱ्याबरोबरच सुक्या चाऱ्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गोठ्यात असलेले पशुधन वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करीत आहे.
मृग आणि आर्द्रा नक्षत्रातील पावसाच्या दडीमुळे जमिनीवर गवतसुद्धा उगवले नाही. ओला चारा नष्ट झाला आहे. सुक्या चाऱ्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना कडब्याची एक पेंडी २० रुपयाला विकत घ्यावी लागत आहे. सन २०१२ मध्ये ९ जुलैपर्यंत १७६ मि.मी. पाऊस कोसळला होता. मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे २० वर्षाचे रेकॉर्ड तुटून परिसरात ९ जुलैपर्यंत तब्बल ६५२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. सन २०१२ व सन २०१३ च्या तुलनेत यंदा परिसरात अत्यल्प पाऊस पडला आहे. यंदा ९ जुलैपर्यंत केवळ २९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहे. जुलै महिन्यातही अनेक गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण तालुक्यातच कोरडा दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भागातील अर्थकारण मात्र बिघडले आहे. आता तालुक्याची संपूर्ण भिस्त इसापूर धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावरच अवलंबून आहे. (प्रतिनिधी)