अखेर वसंतच्या कामगारांचे आंदोलन मागे
By Admin | Updated: November 9, 2014 22:35 IST2014-11-09T22:35:32+5:302014-11-09T22:35:32+5:30
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनीे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले. परंतु कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर

अखेर वसंतच्या कामगारांचे आंदोलन मागे
उमरखेड (कुपटी) : वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनीे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले. परंतु कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांनी कामगारांची समजूत काढली. प्रशासन आणि कामगारातला वाद मिटवत काही मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
दोन दिवसापासून वसंतच्या कामगारांनी कामबंद आंदोलन केले. या दरम्यान अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर व कामगार संघटनेचे अध्यक्ष पी.के. मुडे यांच्यात चांगलीच जुंपली होती. ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर प्रशासन व कामगारांमध्ये सात महिन्यांच्या वेतन थकबाकीमुळे संघर्ष निर्माण झाला होता. त्यामध्ये दोन्ही बाजूच्यावतीने परस्पर विरोधी विधाने झाली. त्यामुळे तणाव वाढतच गेला. साखर कारखाना प्रशासन आणि कामगारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडून विदर्भात एकमेव सुरू असलेला साखर कारखाना बंद पडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून वसंत कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर तेथे दाखल झाले. त्यांनी हस्तक्षेप करीत कामगार संघटनेची समजूत काढली. दहा हजारावरील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेकडो कामगारांचा विचार करून कारखाना जिवंत ठेवण्याची विनंती माजी आमदार आष्टीकर यांनी कामगार नेते पी.के. मुडे आणि व्ही.एम. पतंगराव यांना केली. तसेच सहज निकाली काढता येईल अशा प्रश्नांवर चर्चा केली. त्यामध्ये कामगाराच्या थकीत रकमेची सेवानिवृत्त कामगार आणि नव्याने भरती झालेल्या २४२ कामगारांच्या वाढीव वेतनाबद्दल चर्चा केली. तसेच ३० नोव्हेंबरला एक वेतन देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शिवाय थकीत वेतनाची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी माजी मंत्री मनोहरराव नाईक, माजी आमदार अॅड.अनंतराव देवसरकर आणि कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले. त्यामुळे दोन दिवसापासून सुरू असलेले आंदोलन कामगारांनी मागे घेतले. (वार्ताहर)