उमरखेड तालुक्याचे सिंचनाचे स्वप्न अपूर्णच
By Admin | Updated: May 15, 2015 02:21 IST2015-05-15T02:21:18+5:302015-05-15T02:21:18+5:30
पुसद तालुक्यातील इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उमरखेड तालुक्यासाठी अभिशाप ठरत आहे.

उमरखेड तालुक्याचे सिंचनाचे स्वप्न अपूर्णच
उमरखेड : पुसद तालुक्यातील इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उमरखेड तालुक्यासाठी अभिशाप ठरत आहे. सिंचनाचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. उलट पावसाळ्यात अतिरिक्त पाणी सोडल्याने पूर तर उन्हाळ्यात पैनगंगा कोरडी ठण्ण अशी स्थिती असते. हा प्रकल्प उमरखेड तालुक्यासाठी अभिशाप ठरत आहे.
विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची इसापूर येथे निर्मिती करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहत पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर प्रकल्प उभारण्याचे ठरविले. १९६४ मध्ये या प्रकल्पाला उर्ध्व पैनगंगा असे नाव देण्यात आले. सुरुवातीला या प्रकल्पाचे पाणी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीसह विदर्भातील अनेक तालुक्यांना उपलब्ध होणार होते. उमरखेड तालुक्यातून १७८ किलोमीटरचा उजवा कालवा जाणार होता. तर मराठवाड्यात ८५ किलोमीटरचा डावा कालवा होता. मात्र उजवा कालवा मराठवाड्यात पळविण्यात आला आणि डावा कालवा विदर्भाच्या नशीबी आला. त्यामुळे मराठवाड्यात मुबलक पाणी आले.
१९८१ मध्ये इसापूर धरण पूर्णत्वास आले. कालव्याच्या निर्मितीस सुरुवात झाली. तब्बल १२ वर्षानंतर सिंचनास सुरुवात झाली. गेल्या २६ वर्षांच्या कालखंडात उमरखेड तालुक्याला आवश्यक पाणी मिळाले नाही. कालव्याचे काम अपूर्ण आहे. क्षमतेच्या अवघे ३० टक्के सिंचन या परिसरात होत आहे. शासन दरबारी कुणीही मागणी लावून धरत नसल्याने सिंचनाचे स्वप्न अपूर्ण आहे.
पावसाळ्यात अतिरिक्त पाणी झाले की, नदीपात्रात सोडले जाते. पैनगंगेला कृत्रिम पूर येऊन ४२ गावांना फटका बसतो. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली येते. याऊलट उन्हाळ्यात पैनगंगेचे पात्र कोरडे पडते. धरणाचे पाणी पात्रात सोडले जात नाही. नदी तिरावरील नळ योजनेच्या विहिरी कोरड्या पडतात. पाणीटंचाईची झळ बसते. दरवर्र्षी हा प्रकार सुरू आहे. प्रकल्पाचा फायदा तर होत नाही. उलट पूर आणि पाणीटंचाईची झळ मात्र सोसावी लागते. (शहर प्रतिनिधी)